नवी दिल्ली : विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ म्हणजेच ‘व्हीबी-जी राम जी’ विधेयकावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी लोकसभेत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. गांधीजींचे नाव कायद्यातून वगळणे हा केवळ प्रशासकीय बदल नसून योजनेच्या तात्त्विक आणि नैतिक अधिष्ठानावर घाला असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेदरम्यान थरूर यांनी १९७१ च्या हिंदी चित्रपटातील गाण्याचा संदर्भ देत म्हटले, देखो ओ दीवानों, ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो. ‘जी राम जी’ हे संक्षिप्त रूप तयार करण्यासाठी दोन भाषा वापरणे घटनात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनरेगाच्या जागी आणल्या जाणाऱ्या या विधेयकामुळे ४० टक्के आर्थिक भार राज्यांवर टाकण्यात येत असल्याने गरीब राज्यांसाठी योजना अव्यवहार्य ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. यामुळे मजुरी देण्यात विलंब, कामाचे दिवस घटणे आणि अखेरीस योजना निष्प्रभ होण्याचा धोका असल्याचे थरूर म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गांधीजींचे फोटो हातात घेऊन सभागृहात निषेध नोंदवला, तर सरकारने हे विधेयक ‘विकसित भारत २०२७’च्या ध्येयाशी सुसंगत असल्याचा दावा केला.