सोलापूरच्या शशी खंदारेंचा “जिप्सी’ पोहोचला फ्रान्सच्या ‘कान’ महोत्सवात

Shashi Khandare’s Gypsy Movie In Cannes Film Festival 2024 – फ्रान्समध्ये 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यात सहभागी होण्यासाठी जगभरातील दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री फ्रान्स येथे पोहोचत आहेत. फ्रान्स देशातील कान येथे 14 ते 25 मे या कालावधीत हा महोत्सव संपन्न होत आहे. या जागतिक चित्रपट महोत्सवात जगातील चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत चेहरे सहभागी होतात. भारतातील देखील अनेक सेलिब्रिटी यात सहभागी होतात. विशेष म्हणजे यावर्षी कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटसाठी राज्य शासनाकडून ‘जिप्सी’,’भेरा’आणि ‘वल्ली’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. जिप्सी हा लेखक दिग्दर्शक म्हणून शशी खंदारे यांचा पहिला चित्रपट आहे.
2016 पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठविले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. यावर्षी एकूण 23 चित्रपटांचे प्रवेश प्राप्त झाले होते. त्यातून तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शशी खंदारे यांचा जिप्सी देखील आहे.
या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. या समितीमध्ये श्रीकांत बोजेवार, रसिका आगाशे, अर्चना बोऱ्हाडे, क्षितिजा खंडागळे, संदीप पाटील यांचा समावेश होता. या समितीने तिन्ही चित्रपटांची निवड एकमताने केली.
निवड झालेला जिप्सी या चित्रपटाची निर्मिती ‘बोलपट’ या निर्मिती संस्थेने केली आहे. भेरा या चित्रपटाची निर्मिती ‘वैजप्रभा चित्र निर्मिती’ या संस्थेने केली आहे. तर ‘स्पेसटाइम एंटरटेंमेंट’ या चित्रपट निर्मितीसंस्थेने वल्ली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
“जिप्सी” – भटक्या जमातीतील कुटुंबाची गोष्ट
“जिप्सी” ही आयुष्यभर दिशाहीनपणे भटकणाऱ्या एका भटक्या जमातीतील कुटुंबाची गोष्ट आहे. ‘जोत्या’ या लहान मुलाला रोज भीक मागून आणलेले खराब, शिळं अन्न खावं लागत असल्याने त्याला ताज्या-गरमागरम पदार्थांचे खूप आकर्षक आहे. पण त्याला तसं खायला मिळत नसल्याने नेहमीच त्याला केवळ वासावरच भगवावं लागतं. यातून त्याला पदार्थांचे वास घ्यायची सवय लागते. तर दुसऱ्या बाजूला गरोदरपणातही भटकावं लागत असल्याने त्याच्या आईचा एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी संघर्ष चालू आहे. पुढे जोत्याला एका पदार्थाचा वास भारावून टाकतो. आणि शेवटी हा वासच त्याला आयुष्य बदलण्याची संधी देतो.
शशी खंदारे यांचा संघर्षमयी प्रवास –
शशी खंदारे यांचं मुळगाव हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील यावली हे आहे. ते इयत्ता दुसरी तिसरीत असताना त्यांच्या वडिलांचा छोटासा लघुउद्योग दिवाळखोरीत निघाला. त्यामुळे त्यांच्या आई-वडीलांना गाव सोडून पुण्यामध्ये काहीतरी कामधंदा करायला जावे लागले. मात्र शिक्षणासाठी शशी यांना त्यांच्या आजी-आजोबा आणि काका-काकू कडे ठेवलं. त्यांनी तिथेच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर ते पुण्यामध्ये आले. गावाकडे असताना लहानपणी आई-वडील सोडून गेल्याने शशी यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यातून ते फार भावनिक झाले आणि कविता लिहायला लागले. कवितेनंतर कथा लेख लिहीत असतानाच त्यांना अभिनयाचीही आवड होती.
इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये असताना बालकवी ठोंबरे यांची ‘छोटेसे बहिण भाऊ’ ही कविता त्यांनी स्टेज वरती साअभिनय सादर करून दाखवली होती. तसं पाहिलं तर त्यांच्या घरातच कला होती. परंतु तसा व्यावसायिक स्टेज कोणालाही मिळाला नाही. म्हणजे त्यांचे वडील कविता लिहायचे, आजी कोणाची हुबेहूब नक्कल करून दाखवत असे. तर त्यांच्या आईचे काका तमाशामध्ये सोंगाड्याच काम करायचे. कदाचित या सगळ्यांकडून त्यांच्याकडे कला आली असावी, असे शशी खंदारे सांगतात.
कुठेतरी सावलीतली नोकरी मिळावी म्हणून शशी यांच्या वडिलांनी त्यांना काॅमर्सला प्रवेश घ्यायला लावला. ग्रॅज्युएशन करत असतानाच ते नाटकातही काम करत असत. कामाक्षी नाट्य ग्रुप या नाट्यसंस्थेत त्यांनी अभिनयापासून सारं काही केलं. ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत त्यांनी थिएटर म्हणजे मोस्टली अभिनय केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना अभिनयापेक्षा लिखाण आणि दिग्दर्शनामध्ये जास्त रुची आहे. मग अभिनय सोडून असिस्टंट दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली.
दिग्दर्शनातला शेवटचा असिस्टंट पेपर पासून ते सहदिग्दर्शकापर्यंत बारा वर्षात जवळजवळ वीस पेक्षा जास्त वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. यामध्ये विक्रम गोखले अवधूत गुप्ते यांसारखे मातब्बर मंडळी होते. बारा वर्षानंतर मग स्वतः फिल्म करण्यासाठी जुळवाजुळ सुरू केली आणि जवळ जवळ पाच वर्ष म्हणजे लिखाण सुरू करण्यापासून पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये पहिल्यांदा फिल्मचा स्क्रीनिंग होईपर्यंत पाच वर्षाचा कालखंड लागला. अनंत अडचणीचा सामना करत शेवटी जिप्सी चित्रपट पूर्ण झाला. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट jurumention हे आवार्ड जिप्सी या चित्रपटातील बालकलाकाराला मिळाले. त्यानंतर कान फिल्म फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्र शासनाकडून जे तीन चित्रपटांची निवड होते यामध्ये जिप्सीची निवड झाली. ‘दै. प्रभात’शी बोलताना शशी खंदारे यांनी त्यांचा हा संघर्षमयी प्रवास उलगडला.





