मांडवगणमध्ये शासन आले दारी: लाभार्थ्यांचा प्रतिसाद, विरोधकांकडून आरोपाची राळ

मांडवगण फराटा – शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमास प्रतिसाद मिळाला. दरम्यान, यावेळी शासनाचा कार्यक्रम असून वैयक्तिक कार्यक्रम असल्याचे चित्र निर्माण केले, असा आरोप विरोधकांनी करीत निषेध नोंदवला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
यामध्ये महसूल, भूमिअभिलेख, पंचायत समिती, महावितरण आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासनाची लोकप्रिय योजना माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तहसील कार्यालया मार्फत विशेष आयोजन केले होते. आमदार अशोक यांनी जनतेच्या अनेक अडचणी जाणून घेत संबंधित अधिकारी यांना सोडविण्यासाठी सूचना केल्या. यावेळी अनेक लोकांची प्रलंबित कामे त्वरित करून दिली. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुजाता पवार यांनी वेळ दिला.
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की, शासन आपल्या दारी हा शासनाचाच उपक्रम आहे. कोणाचाही वैयक्तिक नाही. सर्व प्रलंबीत कामे एकाच वेळी होण्यासाठी या उपक्रमात प्रयत्न केला जाईल. उर्वरित कामे आठ दिवसांत पूर्ण होतील. मांडवगण फराटा, वडगाव रासाई जिल्हा परिषद गटातील सरपंच, सदस्य हे आपल्या भागातील लोकांना प्रत्येक विभागातील समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करीत होते.
महावितरण, पुरवठा विभागातील अनेक समस्या आमदार पवार यांच्या प्रयत्नांने जागेवरच सोडविले. ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगटच्या महिला, पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम नियोजनबद्द झाला.
यावेळी आमदार ॲड. पवार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, शिरूर पोलीस ठाण्याचे पीआय ज्योतीराम गुंजवटे, नायब तहसीलदार खरमाटे मॅडम, भूमिअभिलेख उपअधीक्षक अमोल भोसले, महावितरण प्रभारी कार्यकारी अभियंता वनमोरे, गटविकास अधिकारी महेश डोके, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी राजाराम जगताप, मंडलाधिकारी संजीव साळवी, महावितरणचे शाखा अभियंता इर्शाद शेख, पप्पू मुंगसे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे, संगीता बेंगाळ, ग्रामविकास अधिकारी विशाल नाईकनवरे, राजाराम मुरकुटे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, सरपंच समीक्षा कुरुमकर, सुधीर फराटे, नरेंद्र माने, सुभाष कळसकर, लतिका जगताप, दत्तात्रय फराटे, दीपाली नागवडे, माजी सरपंच पल्लवी घाटगे, माजी सरपंच सीमा फराटे उपस्थित होते.
सुधीर फराटे म्हणाले की, शासन आपल्या दारी हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमच्या बोर्डावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असणे आवश्यक होते. या अक्षम्य चुकीचा मी निषेध करतो.





