मध्य प्रदेशातील सागरमधून एक वेदनादायक प्रकरण समोर आले आहे. झोपेत अंथरुणावरून खाली पडल्यानंतर एका 16 वर्षीय मुलाच्या डोक्यात दोन इंचापर्यंत धारदार अवजार घुसले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वेळी मुलाच्या डोक्यातून रक्त निघत नव्हते किंवा त्याला वेदनाही होत नव्हती. ही घटना सागरच्या देवरी भागातील सुना या गावातील आहे.
भूपेंद्र असे या 16 वर्षीय मुलाचे नाव आहे. भूपेंद्र रात्री झोपला होता, त्यादरम्यान तो पलंगावरून खाली पडला आणि पलंगाखाली असलेला विळा त्याच्या डोक्यात घुसला. यावेळी लाईट सुद्धा गेलेली होती. त्यानंतर त्यास तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे 3 तासांच्या ऑपरेशननंतर त्याच्या डोक्यात घुसलेले हे लोखंडी अवजार (विळा) डॉक्टरांनी बाहेर काढले आहे.
न्यूरोसर्जन डॉ. कुलदीप सिंग यांनी सांगितले की, भूपेंद्रचे सिटी स्कॅन करण्यात आले, त्यात असे आढळून आले की, त्याच्या डोक्याच्या आत सुमारे 4 सें.मी. पर्यंत विळा घुसला होता. भूपेंद्र प्रकृती पाहता त्याला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले, तेथे 6 डॉक्टरांच्या पथकाने 3 तासांची यशस्वी शस्त्रक्रिया केली. ऑपरेशननंतर भूपेंद्रची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.