ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्राहम स्टेन्स यांच्या जीवनावर आधारित असलेल्या एका चित्रपटात बॉलीवूड अभिनेता शरमन जोशीसह स्टीफन बाल्डविन आणि शारी रिग्बी आदी हॉलीवूडमधील कलाकार एकत्रित झळकणार आहेत. हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
‘ग्राहम स्टेन्स ः एक अनकही सच्चाई’ हा चित्रपट त्या धक्कादायक घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये एका ऑस्ट्रेलियन मिशनरीची त्याच्या दोन मुलांसह भारतात हत्या करण्यात आली होती. हा चित्रपट गतवर्षी इंग्रजीत प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाविषयी शरमन म्हणाला, मी यात मानव बॅनर्जी नामक एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. जो योग्य आणि अयोग्यच्या कचाट्यात अडकतो. ज्यानंतर त्याला अशा एका सत्याची जाणीव होते ज्यामुळे तो पुन्हा आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी लढण्यास तयार होतो.
या चित्रपटातील ही भूमिका खूपच महत्त्वपूर्ण असून ती साकारताना मला खूपच चांगला अनुभव आल्याचे त्याने सांगितले. तसेच हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे तो म्हणाला. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिश डॅनियल यांनी केले आहे.