ऐन तेजीतही सरकारी बॅंकांचे शेअर पिछाडीवर

नवी दिल्ली – शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. मात्र, या परिस्थितीतही सरकारी बॅंकांच्या शेअरचे भाव मात्र वाढत नाहीत. परिस्थिती अशी आहे की, 12 सरकारी बॅंकांपैकी 5 बॅंकांच्या शेअरचे भाव त्यांच्या दर्शनी मूल्याच्या पातळीवर आहेत.
इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या शेअरचा भाव दर्शनी मूल्यापेक्षा कमी आहे. तर महाराष्ट्र बॅंक, युको बॅंक, पंजाब अँड सिंध बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शेअरचे भाव दर्शनी मूल्याच्या जवळपास आहेत. याबाबत रेलिगेअर ब्रोकिंग कंपनीचे मुख्य कार्य अधिकारी गुरप्रीत सिदाना यांनी सांगितले की, बऱ्याच खासगी कंपन्यांचे भाव 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर असताना काही सरकारी बॅंकांच्या शेअरचे भाव मात्र 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत.
सरकारी बॅंकांची मालमत्ताविषयक परिस्थिती खराब झाली आहे. अनुत्पादक मालमत्ता वाढली आहे. तर कर्ज वितरण कमी झाले आहे. या सर्वांचा परिणाम या बॅंकांच्या शेअरवर झाला आहे. बहुतांश बॅंकांमध्ये सरकारचे भांडवल 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांचे फारच कमी शेअर शेअर बाजारावर उपलब्ध आहेत. तरीही या शेअरला फारसा भाव नाही.
बाजारात तेजी रेंगाळण्याची शक्यता
दरम्यान, लवकरच दुसरे पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विप्रो, इन्फोसिस कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. या कारणामुळे आगामी काही काळ शेअर बाजारात तेजी रेंगाळण्याची शक्यता ब्रोकर्सनी व्यक्त केली. सरलेल्या आठवड्यात मुख्य निर्देशांकात चार टक्क्यांची वाढ झाली आहे.





