Share Market: भारतीय शेअर बाजाराने सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी नव्या सप्ताहाची सकारात्मक सुरुवात केली असून बाजार सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या निशाण्यावर बंद झाला आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा फायदा घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४७९.९५ अंकांनी म्हणजेच ०.५८ टक्क्यांनी वधारून ८३,२९४.६६ वर स्थिरावला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४१.७५ अंकांची म्हणजेच ०.५५ टक्क्यांची वाढ होऊन तो २५,७१३ च्या पातळीवर बंद झाला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले टॅरिफ रद्द केल्यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम दलाल स्ट्रीटवर पाहायला मिळाला. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.९६ लाख कोटी रुपयांची भर – बाजाराच्या सकाळच्या सत्रात मोठी तेजी दिसून आली असली तरी दुपारच्या सुमारास काही प्रमाणात नफावसुली झाली. याचे मुख्य कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास सर्व देशांवरील तात्पुरते ग्लोबल टॅरिफ १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र शेवटच्या तासाभरात पुन्हा एकदा खरेदीचा ओघ वाढल्याने बाजार दिवसाच्या उच्चांकी स्तराच्या जवळ बंद होण्यात यशस्वी ठरला. या तेजीमुळे बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४६७.११ लाख कोटींवरून वाढून ४६९.०७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच आजच्या एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.९६ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. क्षेत्रीय कामगिरीचा विचार करता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSU Banks) निर्देशांकात १.३ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली. त्यापाठोपाठ फार्मा, ऑईल अँड गॅस, इन्फ्रा, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्येही सुमारे अर्धा टक्क्याची तेजी नोंदवण्यात आली. दुसरीकडे आयटी क्षेत्राला मात्र मोठा फटका बसला असून हा निर्देशांक १.४ टक्क्यांनी घसरला. मेटल इंडेक्समध्येही ०.२ टक्क्यांची किरकोळ घसरण झाली. मिडकॅप इंडेक्स ०.४ टक्क्यांनी घसरला असला तरी स्मॉलकॅप इंडेक्स ०.३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ३० पैकी १९ शेअर्स आज नफ्यात – सेन्सेक्समधील ३० पैकी १९ शेअर्स आज नफ्यात राहिले, ज्यामध्ये अदाणी पोर्ट्सने २.९८ टक्क्यांसह सर्वाधिक कमाई केली. त्याखालोखाल कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड आणि ॲक्सिस बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १.३४ ते २.२२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मात्र, घसरणीच्या बाजूला इन्फोसिसचा शेअर १.८० टक्क्यांसह टॉप लूझर ठरला. याशिवाय टेक महिंद्रा, ट्रेंट, एचसीएल टेक आणि बजाज फिनसर्व्ह या शेअर्समध्येही ०.५३ ते १.०६ टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. आजच्या व्यवहारादरम्यान बीएसईवर एकूण ४,४९७ शेअर्समध्ये उलाढाल झाली. जरी मुख्य निर्देशांक वाढले असले, तरी बाजारात घसरणाऱ्या शेअर्सची संख्या वाढणाऱ्या शेअर्सपेक्षा जास्त होती. एकूण १,९२६ शेअर्स तेजीसह बंद झाले, तर २,३८९ शेअर्समध्ये घसरण झाली. सुमारे १८२ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. विशेष म्हणजे, आज १२४ शेअर्सनी त्यांच्या ५२-आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर २३८ शेअर्स त्यांच्या वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.