शेअर बाजाराची भरारी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी, पाहा कोणत्या शेअर्सच्या किंमतीत सर्वाधिक वाढ?

Share Market | भारतीय शेअर बाजारातील घसरणीला आज सकाळच्या सत्रात काहीसा ब्रेक लागल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. एकीकडे जागतिक बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र, भारतीय गुंतवणूकदार सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी सेन्सेक्समध्ये 700 अंक आणि निफ्टीमध्ये 250 अंकांची वाढ दिसून आली आहे.
बेंचमार्क इंडेक्स असलेल्या BSE सेंसेक्स आज 162.63 अंकांसह 73,152.56 वर उघडला, तर निफ्टी 50 ने 52.85 अंकांच्या वाढीसह 22,135.50 वर व्यापार सुरू केला. निफ्टीच्या 30 शेअर्समध्ये वाढ दिसली, तर 20 शेअर्समध्ये घट दिसून आली.
सकाळी 11:45 वाजता सेनेस्कसमध्ये 750 अंकांची वाढ दिसून आली. या वाढीसह सेन्सेक्स 73,740 अंकांवर व्यवहार करत होता. तर दुसरीकडे निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह 22,340 अंकांवर आहे. सर्व सेक्टरल इंडेक्स हिरव्या रंगात व्यापार करत आहेत. पॉवर आणि मेटलमध्ये प्रत्येक 3 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स प्रत्येकी 2 टक्क्यांनी वाढले आहेत.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक्नोलॉजीज, टेक महिंद्रा, अदाणी पोर्ट्स, टाटा मोटर्स, पावर ग्रिड, एनटीपीसी, इन्फोसिस, टीसीएस आणि भारती एयरटेलमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली.तर दुसरीकडे बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स लाल रंगात दिसत आहेत.
दरम्यान, इक्विटी बाजारातील सततच्या विक्रीमुळे गेल्या 5 महिन्यांत गुंतवणूकदारांचे तब्बल 94 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. निफ्टीमध्ये मागील सलग 10 दिवस घसरण पाहायला मिळाली. सप्टेंबर 2024 मधील आपल्या उच्चांकापासून सेन्सेक्स आणि निफ्टी दोघेही 16 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. 2025 मध्येच बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 7 टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत.





