Share Market: छोट्या शेअर्सने कमावला मोठा नफा, गुंतवणूकदारांची संपत्ती एका झटक्यात ₹3 लाख कोटींनी वाढली

Share Market 19 August: संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान आज 19 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी जवळजवळ सपाट बंद झाले. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आज सुमारे तीन लाख कोटी रुपयांची कमाई केली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.53 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.33 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बीएसई मेटल इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक वाढला. तर तेल आणि वायू, ऊर्जा आणि उपयुक्तता निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले. दुसरीकडे, ऑटो आणि बँकिंग समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 12.16 अंकांनी किंवा 0.01 टक्क्यांनी किरकोळ घसरून 80,424.68 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 31.50 अंकांच्या किंवा 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 24,572.65 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी ₹2.98 लाख कोटी कमावले –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 19 ऑगस्ट रोजी वाढून 454.57 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी 451.59 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.98 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
आज बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.04 टक्के वाढ झाली आहे. यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), NTPC, JSW स्टील आणि एशियन पेंट्सचे शेअर्स 0.89 टक्क्यांनी ते 1.62 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
तर सेन्सेक्समधील उर्वरित 14 समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) चे समभाग 2.55 टक्क्यांनी घसरले. तर इंडसइंड बँक, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक आणि टाटा मोटर्सचे समभाग 0.89 टक्क्यांपासून 1.13 टक्क्यांनी घसरले.
2,710 समभागांमध्ये वाढ झाली –
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या समभागांची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 4,165 समभागांची खरेदी-विक्री झाली. यातील 2,710 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,322 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 133 समभाग कोणत्याही चढउताराविना समपातळीत बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 288 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 34 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.




