Share Market: तीव्र चढ-उतारांनंतर भारतीय शेअर बाजार बुधवारी (२५ फेब्रुवारी) जवळपास सपाट पातळीवर बंद झाले. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्सने ७०० अंकांपर्यंत झेप घेतली होती; मात्र दुपारनंतर मोठ्या प्रमाणात नफावसुली झाल्याने बाजाराने सारी कमाई गमावली. अखेरीस सेन्सेक्स केवळ ५०.१५ अंक म्हणजे ०.०६ टक्क्यांनी वधारून ८२,२७६.०७ वर स्थिरावला, तर निफ्टी ५७.८५ अंक म्हणजे ०.२३ टक्क्यांनी वाढून २५,४८२.५० वर बंद झाला. ब्रॉडर मार्केट मजबूत – मुख्य निर्देशांक सुस्त राहिले असले, तरी व्यापक बाजाराने चांगली कामगिरी केली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांक एक टक्क्याने वधारला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऑटो, हेल्थकेअर, आयटी, मेटल आणि फार्मा निर्देशांक एक ते दोन टक्क्यांनी वाढले. मात्र टेलिकॉम निर्देशांकात एक टक्का, तर एफएमसीजी व पीएसयू बँक निर्देशांकात ०.४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली – बाजार सपाट राहिला असला, तरी बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मंगळवारच्या ४६५.६४ लाख कोटी रुपयांवरून वाढून ४६७.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल १.६८ लाख कोटी रुपयांची भर पडली. stock market तेजी-मंदीचे चित्र – सेन्सेक्समधील ३० पैकी १९ समभाग हिरव्या क्षेत्रात बंद झाले. एचसीएल टेकने २.८० टक्क्यांची सर्वाधिक वाढ नोंदवली. टाटा स्टील, टीसीएस, इंडिगो आणि सन फार्मा हे समभागही १.८४ ते २.६३ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज २.२३ टक्क्यांनी घसरून सर्वाधिक तोट्यात राहिला. एसबीआय, अदानी पोर्ट्स, इटर्नल आणि भारती एअरटेल यांच्या समभागांमध्येही १.३९ ते १.९३ टक्क्यांपर्यंत घट झाली. बीएसईवर आज एकूण ४,३७० समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,०६५ समभाग तेजीसह, तर २,१३१ समभाग घसरणीसह बंद झाले. १७४ समभाग स्थिर राहिले. ११४ समभागांनी नवा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ३२३ समभागांनी वार्षिक नीचांक नोंदवला. बाजारातील चढ-उतारामागे ‘या’ तीन प्रमुख कारणांचा हात – नफावसुली – सकाळच्या सत्रात सुमारे ०.९ टक्के तेजीनंतर गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवर नफावसुली सुरू केली. बँक निफ्टी दिवसाच्या उच्चांकापासून ०.७ टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी आयटी निर्देशांक इंट्राडेमध्ये २ टक्क्यांच्या वाढीतून थेट १ टक्क्याच्या घसरणीत आला. चॉइस इक्विटी ब्रोकिंगचे संशोधन विश्लेषक हितेश टेलर यांनी सांगितले की, जागतिक अनिश्चितता आणि वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी शिस्तबद्ध आणि निवडक भूमिका घेणे आवश्यक आहे. निफ्टीने २५,८०० च्या वर स्पष्ट आणि टिकाऊ ब्रेकआउट केल्यानंतरच नवीन खरेदीचा विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री – विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) २४ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा विक्रीचा मारा केला. मंगळवारी त्यांनी १०२ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ३,१६१ कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराला आधार दिला. तरीही एफआयआयच्या माघारीमुळे बाजारावरील दबाव कायम राहिला. तांत्रिक पातळ्यांचा अडसर – निफ्टी २५,६७० च्या वर टिकू न शकणे हेही बाजाराच्या कमकुवतपणाचे लक्षण असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य बाजार धोरणकार आनंद जेम्स यांनी सांगितले की, निफ्टीने २५,६७० वर स्थिर राहिल्यास २५,९०० चे लक्ष्य गाठता येईल; मात्र २५,५३० खाली गेल्यास तेजीला ब्रेक लागू शकतो. कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी संशोधन प्रमुख श्रीकांत चौहान यांनी इंट्राडे स्थिती कमकुवत असल्याचे मान्य करतानाच स्पष्ट केले की, बाजार २०० दिवसांच्या साध्या मूव्हिंग सरासरी अर्थात २५,३०० किंवा सेन्सेक्सच्या ८२,००० च्या खाली गेल्यासच मोठी घसरण येईल. या पातळ्यांवर बाजार टिकल्यास २५,५०० ते २५,६५० पर्यंत उसळी शक्य असून, त्याखाली गेल्यास २५,०५० पर्यंत घसरण होऊ शकते. सध्याच्या अस्थिर वातावरणात डे-ट्रेडर्सनी पातळीनुसार व्यवहार करणे अधिक सुरक्षित असल्याचे त्यांनी सुचवले.