मुंबई – एक फेब्रुवारी रोजी रविवार असला तरी शेअर बाजारांचे कामकाज चालू राहील अशी माहिती राष्ट्रीय शेअर बाजार व मुंबई शेअर बाजारानी जारी केली आहे. रविवार असतानाही केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारांनी रविवारी कामकाज चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री करीत असलेल्या भाषणाची माहिती शेअर बाजारात दरवर्षी सादर केली जाते. हा एक आघोषित नियम आहे. हा नियम एक फेब्रुवारीला पाळला जाईल. त्या दिवशी शेअर बाजाराचे कामकाज चालू ठेवण्यात येईल असे दोन्ही शेअर बाजारांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. एक फेब्रुवारी रोजी प्री ओपन मार्केट कामकाज नऊ वाजता सुरू होईल व नऊ वाजून आठ मिनिटांनी संपेल. तर नियमित काम सव्वानऊ वाजता सुरू होईल आणि साडेतीन वाजता संपणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी रविवार असताना अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी शेअर बाजाराचे कामकाज चालू राहील की नाही याबाबत गुंतवणूकदारांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले होते. आता दोन्ही शेअर बाजारांनी जारी केलेल्या पत्रकामुळे या विषयावर पडदा पडला आहे.