Share Market: अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवारी शेअर बाजार सुरु राहणार

मुंबई – अर्थमंत्री निर्मला सितारामन शनिवार 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शनिवारी शेअर बाजारांना सुट्टी असते. मात्र अर्थसंकल्प शनिवारी सादर केला जाणार असल्यामुळे मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज शनिवार 1 फेब्रुवारी रोजी चालू राहील असे या दोन शेअर बाजारांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराने जारी केलेल्या वेगवेगळ्या पत्रकात सांगितल्यानुसार, शनिवारी जरी शेअर बाजार सर्वसाधारणपणे बंद असला तरी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प असल्यामुळे शेअर बाजाराचे कामकाज त्या दिवशी सकाळी सव्वानऊ वाजता सुरू होईल आणि साडेतीन वाजता बंद होईल. काही वर्षांपूर्वी अर्थसंकल्प सायंकाळी पाच वाजता सादर केला जात असे.
नंतर अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जातो. अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जात असला तरी शेअर बाजाराचे कामकाज त्या दिवशी नियमित वेळा प्रमाणे चालते. यावर्षी शनिवारी एक फेब्रुवारी येत आहे. त्या दृष्टिकोनातून शेअर बाजाराने हे स्पष्टीकरण केले आहे.




