Share Market: शेवटच्या तासात खरेदीने शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 223 अंक वधारला; निफ्टी 24894 वर

Share Market: आज शुक्रवारी शेअर बाजार सुरुवातीला घसरला, पण शेवटच्या तासात खरेदीच्या जोरावर तेजीत बंद झाला. गुरुवारी दसरा आणि गांधी जयंतीनिमित्त बाजाराला सुट्टी होती. आज हा आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग दिवस होता. रिझर्व्ह बँकेच्या धोरणाबाबत सकारात्मक अपेक्षांमुळे बाजाराला आधार मिळाला.
बीएसई सेन्सेक्स ८०,६८४.१४ वर घसरत उघडला. दिवसभरातील चढ-उतारात तो ८१,२५१ च्या उच्चांकापर्यंत गेला, तर ८०,६४९ च्या नीचांकावरही पोहोचला. शेवटी २२३.८६ अंक किंवा ०.२८ टक्क्यांच्या वाढीसह ८१,२०७.१७ वर स्थिरावला. तसेच, एनएसई निफ्टी २४,७५९.५५ वर खालावत सुरू झाला. इंट्राडे हाय २४,९०४ आणि लो २४,७४७ असा प्रवास करून ५७.९५ अंक किंवा ०.२३ टक्क्यांच्या तेजीसह २४,८९४ वर थांबला.
सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, अक्सिस बँक, एल अँड टी आणि भारती एअरटेल सर्वाधिक वाढले. तर टेक महिंद्रा, मारुती सुजुकी, अल्ट्राटेक सीमेंट, बजाज फिनसर्व, सन फार्मा आणि आयसीआयसीआय बँकचे शेअर घसरले. क्षेत्रीय पातळीवर निफ्टी मेटल १.८२ टक्क्यांनी आघाडीवर राहिला. पीएसयू बँक आणि कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये १ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी होती. बँकिंग, ऊर्जा, आर्थिक सेवा, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि तेल-गॅस क्षेत्र तेजीत होते. मात्र, ऑटो, रिअल्टी आणि हेल्थकेअर घसरले.
मिडकॅप इंडेक्स ०.८३ टक्के आणि स्मॉलकॅप ०.६९ टक्क्यांनी वर आले. जागतिक बाजारात जपानचा निक्केई ०.४२ टक्क्यांनी वाढला, तर ऑस्ट्रेलियाचा एसअँडपी/एएसएक्स २०० ०.१७ टक्क्यांनी खाली आला. चीन आणि द. कोरियात सुट्टी होती. अमेरिकेत नैस्डॅक ०.३९, एसअँडपी ५०० ०.०६ आणि डॉव जोन्स ०.१७ टक्क्यांनी रेकॉर्ड उच्चांक गाठले.




