Share Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्ध संपवण्यासाठीच्या कराराच्या दिशेने वाटाघाटींमध्ये प्रगती झाल्याचा दावा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने दलाल स्ट्रीटवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि बुधवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.99 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. दिवसाच्या अखेरीस झालेल्या जोरदार खरेदीच्या जोरावर, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 940.73 अंकांनी, म्हणजेच 1.22 टक्क्यांनी वधारून 77,958.52 अंकांवर स्थिरावला. सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 5,99,107.83 कोटी रुपयांनी वाढून 4,72,80,559.98 कोटी रुपये (4.97 ट्रिलियन डॉलर्स) झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युद्ध समाप्त करण्याच्या कराराच्या दिशेने इराणसोबतच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाल्याचा दावा करत, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना संरक्षण देणारा ’प्रोजेक्ट फ्रीडम’ स्थगित केला आहे. ऑनलाइन ट्रेडिंग आणि वेल्थ टेक फर्म असलेल्या ’एनरिच मनी’चे सीईओ, पोनमुडी आर म्हणाले, अमेरिका-इराण शांतता कराराबाबतचा नव्याने निर्माण झालेला आशावाद आणि ऊर्जा किमतींमधील घट यामुळे भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाले. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, अजित मिश्रा म्हणाले की, व्यवसायांसाठी सरकारच्या पत हमी योजनेसह देशांतर्गत अनुकूल घडामोडींमुळे बँकिंग शेअर्सना चालना मिळाली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे प्रभावित झालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मंगळवारी 18,100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह आपत्कालीन पत हमी योजना जाहीर केली. इंटरग्लोब एव्हिएशन, ट्रेंट, एशियन पेंट्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि इटरनल या प्रमुख विजेत्या कंपन्या होत्या. रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसी या पिछाडीवर होत्या. 2,862 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1,365 शेअर्समध्ये घट झाली आणि 167 शेअर्स स्थिर राहिले. रुपया वधारला 61 पैशांनी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत संभाव्य कराराचे संकेत दिल्यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत खाली आल्याने, रुपया डॉलरच्या तुलनेत 61 पैशांनी वधारून 94.57 रूपये प्रती डॉलर झाला. रुपयावर दबाव असल्याने, रिझर्व्ह बँक देखील चलनास आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना संरक्षण देण्याची अमेरिकेची मोहीम ’प्रोजेक्ट फ्रीडम’ ट्रम्प यांनी थांबवल्यानंतर सकारात्मक भावनांना चालना मिळाली. सीआर फॉरेक्स डव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित पाबरी यांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या परकीय चलन साठ्याचा थेट वापर न करता चलनास आधार देण्याचे मार्ग शोधत आहे. सरकारी बँकांना परकीय चलन रोख्यांद्वारे निधी उभारण्यास प्रोत्साहित करणायात येत आहे. डॉलर निर्देशांक 0.66 टक्क्यांनी घसरून 97.79 अंकावर व्यवहार करत होता. ब्रेंट क्रूड, वायदे बाजारात 11.57 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 98.30 डॉलर पातळीवर होते.