Share Market: शेअर निर्देशांक गतीहीन स्थितीत

मुंबई – स्थूल अर्थव्यवस्थेची निराशा जनक कामगिरी, जागतिक पातळीवरील दोन युद्ध, नागरिकांची कमी झालेली क्रयशक्ती या कारणामुळे शेअर बाजारात मंद वातावरण कायम आहे. अशा परिस्थितीत शेअर निर्देशांकात फारसे चढउतार झाले नाहीत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ एक अंकाने वाढून 81,510 अंकावर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 8 अंकांनी म्हणजे 0.04% कमी होऊन 24,610 अंकावर बंद झाला. भारतातील नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाईच्या आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील महागाईची आकडेवारीही जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यातल्या त्यात सुदैवाची बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार काही प्रमाणात खरेदी करू लागले आहेत.
गेल्या दहा दिवसात या गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली आहे. सोमवारी या गुंतवणूकदारांनी 727 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
शेअर निर्देशांक सध्याच्या पातळीवर योग्य आहेत. अशा परिस्थितीत खरेदी किंवा विक्री करणे योग्य होणार नाही असे बर्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. अमेरिकेतील परिस्थिती सुधारल्यास माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, या आशेने बरेच गुंतवणूकदार माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक सध्या बर्याच उच्च पातळीवर आहे.





