मुंबई – शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर कपात झाली नाही. दुसर्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करून झाले आहेत. महागाईची आकडेवारी उच्च पातळीवर आहे. दुसर्या तिमाहितील विकासदर कमी झाला आहे. जागतिक परिस्थिती नकारात्मक आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना निर्णय घेणे अवघड झाले आहे. सोमवारी काही ब्लुचूप कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली व निर्देशांकात माफक घट झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 200 अंकांनी म्हणजे 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 81,508 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 58 अंकांनी कमी होऊन 24,619 अंकावर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक इत्यादी ब्लूचिप कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात नफेखोरीमुळे घट झाली. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, भारती एअरटेल, पावर ग्रीड या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. तरी त्यामुळे निर्देशांकांना फारसा आधार मिळू शकला नाही. मेहता इक्विटीज या संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आशादायक असेल असे म्हणून गेल्या आठवड्यामध्ये निर्देशांकात बरीच वाढ झाली होती. गेल्या तीन आठवड्यापासून निर्देशांक वाढत होते. मात्र पतधोरणामुळे गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला आहे. अशा परिस्थितीत बरेच गुंतवणूकदार कुंपणावर बसून असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आले. त्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदीसाठी कुठलेही कारण दृष्टिपतात नव्हते. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी होऊन सध्या 71 डॉलर प्रति पिंपावर आल्या आहेत. जर या किमती अशाच राहिल्या तर निर्देशांकांना याचा काही प्रमाणात आधार मिळू शकेल. परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री दरम्यान गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात आणि रोखे बाजारात बरीच खरेदी केली होती. मात्र रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानंतर या गुंतवणूकदारानी आता खरेदी कमी केली आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 1,830 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करू नका काढून घेतला. देशातील संस्थागत गुंतवणूदार काही प्रमाणात खरेदी करीत आहेत.