Share Market: शेअर बाजार निर्देशांक कोसळले; टीसीएस, इन्फोसिस, रिलायन्स पिछाडीवर

मुंबई – जपानच्या रिझर्व्ह बँकेने 17 वर्षात प्रथमच व्याजदरात वाढ केली आहे. या अगोदर करोनाच्या काळातही जपानमधील रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली नव्हती. यामुळे आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक सकाळी कोसळले. त्यानंतर भारतीय शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशांक कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 736 अंकांनी म्हणजे एक टक्क्यांनी कोसळून 72,012 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 238 अंकानी कोसळून 21,817 अंकावर बंद झाला.
अमेरिकेचे आणि इंग्लंडचे पतधोरणही या आठवड्यात जाहीर होणार आहे. अमेरिकेतील महागाई आणि बेरोजगारी वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे अमेरीकेच्या पतधोरणाकडे गुंतवणूकदारांचे जास्त लक्ष लागले असल्याचे सांगण्यात आले.
विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टेक्नॉलॉजी या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर कोसळले.
इंडसइंड बँक, नेस्ले, पावर ग्रीड, आयटीसी, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. मात्र अशा अवस्थेतही बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी बँक, बजाज फिन्सर्व, टायटन, भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र विक्रीचा जोर इतका होता की त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही.
जीओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, जपानमध्ये व्याजदर वाढ झाल्यानंतर आता आशियाई अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असली तरी परदेशी नकारात्मक परिस्थितीचा भारताला संसर्ग लागू शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री
खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळेही भारतीय शेअर बाजारावर याचा परिणाम होत आहे. माहीती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक आज जवळजवळ तीन टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर तंत्रज्ञान, दूरसंचार, सेवा क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले, मिडकॅप आणि स्मॉल कॅप जवळजवळ दीड टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 2,051 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.





