Share Market: भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी (२६ डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली चौफेर विक्री आणि रुपयाच्या मूल्यातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेंसेक्स’ ३६७ अंकांनी कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २६,१०० च्या पातळीखाली बंद झाला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात तब्बल १.०६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आज बाजार बंद होताना सेंसेक्स ३६७.२५ अंकांच्या (०.४३%) घसरणीसह ८५,०४१.४५ वर स्थिरावला. निफ्टीमध्येही ९९.८० अंकांची (०.३८%) घट होऊन तो २६,०४२.३० वर बंद झाला. केवळ मोठे शेअर्सच नव्हे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांतही अनुक्रमे ०.१८% आणि ०.३४% ची घसरण नोंदवण्यात आली. घसरणीची मुख्य कारणे – विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) आपली गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया कमकुवत झाल्याचा परिणाम बाजारावर झाला. क्रूड ऑईलच्या किमतीत झालेली वाढ भारतीय बाजारासाठी चिंतेचा विषय ठरली. अनेक प्रमुख क्षेत्रांतील शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी विक्रीचा सपाटा लावला. आयटी आणि ऑटो बॅकफूटवर मेटल आणि कमोडिटी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांत आज लाल निशाण पाहायला मिळाले. सर्वाधिक फटका आयटी, टेलिकॉम आणि ऑटो क्षेत्राला बसला. बँकिंग, फार्मा आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातही दबाव होता. मात्र, बाजार घसरलेला असतानाही डिफेन्स आणि रेल्वे क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आजचे टॉप लूझर्स: बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक १.४८% घसरण झाली. त्यापाठोपाठ एशियन पेंट्स, एचसीएल टेक, टीसीएस आणि इटरनल या कंपन्यांचे शेअर्स १.१२% ते १.४१% पर्यंत घसरले. आजचे टॉप गेनर्स: घसरणीच्या वातावरणातही ‘टायटन’च्या शेअरने २.१३% ची उसळी घेतली. एनटीपीसी, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या शेअर्समध्येही किंचित वाढ झाली. ४,३७९ शेअर्समध्ये व्यवहार आज दिवसभरात बीएसईवर एकूण ४,३७९ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,७४५ शेअर्स वधारले, तर २,४५५ शेअर्समध्ये घट नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, ११२ शेअर्सनी आज आपला ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर १२० शेअर्स नीचांकी पातळीवर पोहोचले.