Share Market : शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम; सलग दुसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात झाली घट

मुंबई : आखातातील युद्ध वाढत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या पत धोरण समितीची बैठक चालू आहे. अशा परिस्थितीत सावध गुंतवणूकदाराकडून कालपासून विक्री चालू आहे. त्यामुळे सलग दुसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 138 अंकांनी कमी होऊन 81,444 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.17 टक्क्यांनी म्हणजे 41 अंकांनी कमी होऊन 24,812 अंकावर बंद झाला.
टीसीएस कंपनीचा शेअर आज दोन टक्क्यांनी कोसळला. अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिन्सर्व, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, इन्फोसिस, एनटीपीसी, एचसीएल टेक या ब्लूचीप कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेल्यामुळे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. इंडसइंड बँकेच्या शेअरचा भाव मात्र आज तब्बल पाच टक्क्यांनी वाढला. पुढील बारा महिन्यांत व्यवसाय वाढत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यामुळे या बँकेच्या शेअरची खरेदी झाली. महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती कंपनीच्या शेअरच्या भावातही सव्वा टक्क्यापर्यंत वाढ झाली.
आजच्या संमिश्र परिस्थितीमध्ये शेअर बाजारावर नोंदलेल्या 2,447 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर 1,531 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. महत्त्वाची बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 1,482 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 8,207 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र तरीही किरकोळ गुंतवणूकदाराकडून विक्री चालू असल्यामुळे निर्देशांक कालपासून कमी होत आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब म्हणजे खनिज तेलाचे दर अजूनही 75 डॉलरच्या जवळपास आहेत.
अमेरिकेच्या पतधरणाकडे लक्ष
अमेरिकेच्या पत धोरण समितीची बैठक चालू आहे. गुरुवारी पत धोरण समिती आपला निर्णय जाहीर करेल. बहुतांश विश्लेषकांनी व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे सूचित केले आहे. मात्र आगामी काळात फेडरल रिझर्व काय भूमिका घेणार या संदर्भातील वक्तव्य फेडरल रिझर्वकडून अपेक्षित आहे. यामुळे देश- विदेशातील गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत.





