प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शेअरमार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देतो म्हणून प्रलोभन दाखवून एका नागरिकाची तब्बल ६१ लाख ९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना ३ जून ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने एम्पायर स्क्वेअर येथे घडली.याप्रकरणी प्युअर प्राॅफिट शेअर मार्केट कंपनीचे संचालक, ज्योती (मोबाइल ७०३९५१२२६१), पूजा (मोबाइल ८१०८४०५१२६), निकेत (मोबाइल ८१०८४०७९१८), पियुष अग्रवाल (मोबाइल ८१०८४०६१५०), सी ५ इंडेक्स हंटर ग्रुपवरील करणसिंग (मोबाइल ९००७७२८३९१), आलोक (मोबाइल ८६७०३६१२४६) व इतर अज्ञात बँक खातेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एम्पायर स्क्वेअर, चिंचवड येथील ५३ वर्षीय नागरिकाने मंगळवारी (दि. ३०) याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांना अॅपमधून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर ग्रुपमधून दुसऱ्या अॅपवरून आयपीओ व शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीस नफ्याचे स्क्रीनशॉट दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादींकडून ३४.८९ लाख आणि २६.२० लाख अशी एकूण ६१ लाख नऊ हजार रुपयांची रक्कम घेतली; मात्र नफा न देता व रक्कम न परत करता फसवणूक केली.