Share Market: परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री चालूच; मे महिन्यात आतापर्यंत काढून घेतले 22 हजार कोटी रुपये

Share Market Update – अमेरिकेतील उच्च पातळीवरील व्याजदर आणि भारतात होत असलेल्या निवडणुका या कारणामुळे मे महिन्यामध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 22 हजार कोटी रुपये भारतातील भांडवल बाजारातून काढून घेतले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर हे गुंतवणूकदार काही प्रमाणात भारतात गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये या गुंतवणूकदारानी 8,700 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेतली होती. मात्र मे महिन्यामध्ये आतापर्यंत 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे हे गुंतवणूकदार त्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत. भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या गुंतवणूक विषयक करारामध्ये काही बदल करण्यात आल्यामुळेही परदेशी गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे सांगण्यात येते.
मार्च महिन्यामध्ये या गुंतवणूकदारांनी तब्बल 35,098 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली होती. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. त्यानंतर मॉरीशच प्रकरण उद्भवले. त्यानंतर या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्री करण्याचा सपाटात सुरू केला असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.
पुढील आठवड्यात भारतातील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. नंतर शेअर बाजारात तेज येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारतात खरेदी करू लागतील असे समजले जाते. भारतातून गुंतवणूक काढून घेत असतानाच परदेशी गुंतवणूकदारांनी चिनी शेअर बाजारात मात्र गुंतवणूक वाढविली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तेथे केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरेल असे वातावरण निर्माण झाले आहे.
परदेशी गुंतवणूकदारांनी या कालावधीत भारतातून गुंतवणूक काढून घेतली असले तरी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्चांकी पातळीवर आहेत. याचा अर्थ भारतातील किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी या कालावधीत भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जर आगामी काळामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक आणखी वाढले तर देशातील या गुंतवणूकदारांना याचा लाभ होणार आहे.
दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेत व्याजदर उच्च पातळीवर आहेत. डिसेंबर पर्यंत या व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. अगोदर जूनमध्ये कपात होईल असे समजले जात होते. मात्र तेथील महागाई कमी होत नसल्यामुळे व्याजदर उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे डॉलरशी संलग्न वित्तीय उत्पादनात परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करीत आहेत. परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून विक्री करत असले तरी काही प्रमाणात हे गुंतवणूकदार भारतीय रोखे बाजारामध्ये खरेदी करीत असल्याचे दिसून येतेे.





