Share Market Rise: शेअर बाजारात ‘तूफानी’ तेजी: सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला, निफ्टी 25,700 च्या उंबरठ्यावर
Share Market Rise: सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ८२,२७६ अंकांपर्यंत खाली घसरला होता, तर निफ्टीने २५,३७२ चा नीचांक गाठला होता. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स ८३,२७७.१५ वर (०.७९% वाढ) आणि निफ्टी २५,६८२.७५ वर (०.८३% वाढ) स्थिरावला.

Share Market Rise: भारतीय शेअर बाजारात सोमवारी कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रात मोठी घसरण झाल्यानंतर बाजार सावरला आणि अखेरच्या तासांत गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स ६५० हून अधिक अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’नेही २५,७०० ची महत्त्वाची पातळी गाठली.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ८२,२७६ अंकांपर्यंत खाली घसरला होता, तर निफ्टीने २५,३७२ चा नीचांक गाठला होता. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स ८३,२७७.१५ वर (०.७९% वाढ) आणि निफ्टी २५,६८२.७५ वर (०.८३% वाढ) स्थिरावला.
तेजीची ‘ही’ आहेत ४ प्रमुख कारणे-
१. व्हॅल्यू बाइंग: गेल्या शुक्रवारी झालेल्या १००० अंकांच्या घसरणीनंतर अनेक दर्जेदार शेअर्स स्वस्त झाले होते. गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा घेत रियल्टी, फार्मा आणि एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील शेअर्समध्ये खालच्या स्तरावर मोठी खरेदी केली.
२. दिग्गज शेअर्समध्ये खरेदीचा ओघ: रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक यांसारख्या बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवला. या ‘हेवीवेट’ शेअर्समधील तेजीमुळे बाजाराचा मूड बदलला.
३. बँकिंग सेक्टरची साथ: क्रेडिट ग्रोथच्या सकारात्मक अपेक्षेमुळे बँकिंग शेअर्समध्ये १.२ टक्क्यांची वाढ दिसून आली. निफ्टी बँक इंडेक्सने बाजाराला सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
४. मिश्र जागतिक संकेत: आशियाई बाजारात हाँगकाँगचा ‘हँग सेंग’ वधारला होता, तर जपानचा ‘निक्केई’ सपाट राहिला. जागतिक स्तरावरील या संमिश्र संकेतांचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.
क्षेत्रीय कामगिरी आणि नफा-तोटा –
बाजारात आज पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSU), रियल्टी आणि ऊर्जा क्षेत्रातील निर्देशांकात १ ते २ टक्क्यांची वाढ झाली. दुसरीकडे, ऑटो आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्सवर काहीसा दबाव दिसून आला.
टॉप गेनर्स: पॉवर ग्रीड, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, अदानी एंटरप्रायझेस, ॲक्सिस बँक.
टॉप लूझर्स: टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा.
रुपया स्थिर –
शेअर बाजारात तेजी असली तरी विदेशी चलन बाजारात रुपया सोमवारी स्थिर राहिला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ९०.६६ (तात्पुरता आकडा) वर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट रुपयासाठी दिलासादायक ठरली, मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) काढलेल्या निधीमुळे रुपयाच्या वाढीवर मर्यादा आल्या.





