Share Market : रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक तेजीत; शेअर बाजार निर्देशांकात माफक वाढ

मुंबई : शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असतानाच भारत -अमेरिका व्यापार कराराची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. अशा परिस्थितीत सावध गुंतवणूकदाराकडून मंगळवारी माफक खरेदी होऊन निर्देशांकात वाढ नोंदली गेली. गुंतवणूकदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक या ब्लूचीप कंपन्यांच्या शेअरची खरेदी केल्यामुळे मुख्य निर्देशांक वाढण्यास मदत झाली.
जीओजीत इन्व्हेस्टमेंटस् कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, 9 जुलैपूर्वी अमेरिकेने जगातील बहुतांश देशांना अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यास सांगितले आहे. ती मुदत जवळ येत असल्यामुळे देश- विदेशातील गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 90 अंकांनी वाढून 83,697 अंकावर बंद झाला.
सेन्सेक्स संदर्भातील 17 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर 13 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 24 अंकांनी म्हणजे 0.10 टक्क्यांनी वाढून 25,541 अंकावर बंद झाला. भारत इलेक्ट्रॉनिक्स, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर अॅक्सिस बँक,ट्रेंट, इरटर्नल, टेक महिंद्रा या कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली.
परदेशी सस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 831 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. खनिज तेलाचे दर सध्या माफक पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना चिंतेचे कारण उरलेले नाही. रुपया बळकट होत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक आगामी काळात वाढत राहण्याची शक्यता जास्त आहे.




