Stock Market : शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; ट्रेंटच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ
Stock Market : माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समधील खरेदी आणि ट्रेंटच्या चांगल्या निकालामुळे सेन्सेक्स ३०८ अंकांनी वाढला. निफ्टीही २३ हजारांवर पोहोचला.

Stock Market : माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी आणि टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंटच्या चांगल्या तिमाही निकालामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स ३०८.४९ अंकांनी वाढून ७४,४५९.५३ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो ५९१.५५ अंकांनी वाढून ७४,७४२.५९ अंकांवर पोहोचला होता.
निफ्टीही ११६.३५ अंकांनी वाढून २३,०५३.१० अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील ट्रेंटचा शेअर ५.२० टक्क्यांनी वाढला. सप्टेंबर तिमाहीत ट्रेंटचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर २५ टक्क्यांनी वाढून ४६८ कोटी रुपये झाला.
इंटरग्लोब एव्हिएशन, इन्फोसिस, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एटरनल, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्येही वाढ झाली. एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा स्टीलचे शेअर्स घसरले.
दरम्यान, ब्रेंट कच्च्या तेलाचा दर २.१७ टक्क्यांनी वाढून ११७.४ डॉलर प्रति बॅरल झाला. गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ९४३.६० कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.





