मुंबई : जीएसटी परिषदेने बहुतांश जीवन आवश्यक वस्तूवरील जीएसटी कमी केला आहे. त्याचबरोबर इतर वस्तूंच्या जीएसटीतही कपात केली आहे. त्यामुळे भारतीय उद्योग जगतात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सकाळच्या सत्रात शेअर बाजारचे निर्देशांक उंचावले होते. मात्र दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. त्यामुळे निर्देशांकांना उच्च पातळी राखता आले नाही. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 888 अंकांनी वाढला होता. मात्र बाजार बंद होताना हा निर्देशांक कालच्या तुलनेत केवळ 150 अंकांनी वाढून 80,718 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स संबंधातील 19 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. 11 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 19 अंकानी म्हणजे 0.08 टक्क्यांनी वाढून 24,734 अंकावर बंद झाला. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच वाढले होते. अशा परिस्थितीत जीएसटी परिषदेने दर कपातीचा निर्णय घेतल्यानंतर सकाळी बाजारात उमेदीचे वातावरण होते. मात्र जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे निर्देशांकांना ही पातळी राखता येणार नाही असे समजणार्या गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे दुपारच्या सत्रात शेअर बाजाराचे निर्देशांक वेगाने कमी झाले. काल दिवसभर चर्चा झाल्यानंतर जीएसटी परिषदेत दसर्यापासून दर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत उद्योग जगतातून तसेच ग्राहकामधून समाधानाचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्षात लघु पल्ल्यात जरी कर संकलन कमी होणार असले तरी मागणी वाढून दीर्घ पल्ल्यात कर संकलन वाढेल आणि केंद्र सरकारला राज्यांना नुकसान भरपाई देण्याचा गरजच पडणार नाही. मुळात जरी नुकसान झाले तरी राज्यांबरोबर केंद्र सरकारचे होणार आहे, असा युक्तिवाद केंद्राकडून जीएसटी परिषदेत करण्यात आला.