शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे ‘या’ शेअर्सला बसला सर्वाधिक फटका

Share Market News | भारतीय शेअर बाजारातील घसरण सातत्याने सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात खराब झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रमुख 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स काही जवळपास 400 अंकाने खाली आला, निफ्टीमध्ये 121 अंकांची घसरण दिसून आली.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुस्त सुरुवात दिसून आली. सेन्सेक्स 71 अंकांच्या घसरणीसह 77,789 वर उघडला, तर निफ्टी 16 अंकांनी घसरून 23,543 वर उघडला. सकाळी 10.15 वाजता सेन्सेक्स 635 अंकांनी घसरून 77,220 अंक आणि निफ्टी 190 अंकांनी घसरून 23,370 अंकांवर व्यवहार करत होता. ऊर्जा, आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. सर्व स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर 25% कर लादणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे.
या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
आज लार्जकॅप कंपन्यांमध्ये टाटा स्टील शेअर (3%), पॉवरग्रिड शेअर (2.35%) मध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली आहे. सकाळच्या सत्रात,एनटीपीसी, झोमॅटो, सन फार्मा आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये देखील 1% पेक्षा जास्त घसरण दिसून आली. याशिवाय मिडकॅप कंपन्यांमध्ये आलकेम शेअर (5.57%), डेलिव्हरी शेअर (4.77%), सन टीव्ही (4.63%) आणि ऑईल इंडिया शेअर (4.06%) वर ट्रेड होत होते. स्मॉलकॅपमध्ये एनजीएल फाइन शेअर सर्वाधिक 18.38 टक्क्यांनी घसरले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर 25% टॅरिफ लावण्याच्या संभाव्य घोषणेमुळे बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे जागतिक व्यापार युद्धाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील झाला आहे.




