Share Market : बँकांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांकडून नफेखोरी

मुंबई : या अगोदर कामकाजाच्या चार दिवसात शेअर बाजाराचे निर्देशांक 2.66 टक्क्यांपर्यंत वाढले होते. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी बरीच विक्री करून सोमवारी नफा काढून घेतला. नफ्यासाठी बँकांच्या शेअरची जास्त प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे चार दिवसानंतर शेअर बाजार निर्देशांकात घट झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 452 अंकानी कमी होऊन 83,606 अंकावर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.47 टक्क्यांनी म्हणजे 120 अंकांनी कमी होऊन 25,517 अंकावर बंद झाला. अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, एअरटेल, एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. तर ट्रेंट, स्टेट बँक भारत इलेक्ट्रॉनिक्स, टायटन, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
आखातातील युद्ध समाप्त झाले आहे. भारत- अमेरिकेदरम्यान व्यापार करार होण्याची शक्यता आहे. चीन आणि अमेरिकेचा व्यापार करार अगोदरच झाला आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात खरेदीचे वातावरण होते. मात्र भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफेकोरी केल्यामुळे निर्देशांक कमी झाले. आता भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत.
लवकरच कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर आगामी काळात निर्देशांकांना दिशा मिळेल असे जिओजित इन्व्हेस्टमेंटस् या कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असून शुक्रवारी या गुंतवणूकदारानी 1,397 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. रुपया बळकट होत आहे. तर डॉलर कमकुवत होत आहे. अशा परिस्थितीत या गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणूक नफादायक ठरणार आहे.
त्यामुळे हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण होते. दक्षिण कोरिया, जपान, चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. तर हाँगकाँग मधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक सकाळी घसरले होते. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते.





