Share Market: धक्कादायक! 2025 च्या पहिल्याच महिन्यात गुंतवणूकदाराना 32 लाख कोटींचे नुकसान, पत्त्यांसारखे कोसळले ‘हे’ शेअर्स

Share Market News | नववर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जवळपास महिन्याभरात गुंतवणूकदारांना जवळपास 32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 1 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत या कालावधीत सेन्सेक्स सुमारे 2780 अंकांनी किंवा 3.60 टक्क्यांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये सुमारे 810 अंकांनी किंवा 3.10 टक्क्यांची घसरण दिसून आली. याच कालावधीमध्ये बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 32 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
31 डिसेंबर 2024 ला बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4,41,95,106.44 कोटी रुपये होते. तर 27 जानेवारी 2025 पर्यंत ते 4,10,08,630.76 कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच सुमारे 32 लाख कोटी रुपयांनी कंपन्यांचे मार्केट कॅप कमी झाले आहे.
इतर इंडेक्समध्ये देखील मोठी घसरण
महिन्याभरात बँक निफ्टी 5.5 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी आयटी इंडेक्समध्ये जवळपास 3 टक्क्यांनी घसरण झाली. मिडकॅप इंडेक्स 10 टक्क्यांहून अधिक, बीएसई 500 इंडेक्स 6.5 टक्के, बीएसई एफएमसीजी इंडेक्स 2.82 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 12 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे.
बीएसई कंझ्यूमर गुड्स इंडेक्समध्ये 9.85 टक्के. कंझ्यूमर ड्यूरेबल्स इंडेक्स 11.8 टक्के, बीएसई पीएसयू इंडेक्स 7.3 टक्के, ऑटो इंडेक्स 4.23 टक्के, मेटल इंडेक्स 4.16 टक्के, ऑइल अँड गॅस इंडेक्स 5.72 टक्के, रिएल्टी इंडेक्स 19.84 टक्के आणि पॉवर इंडेक्स 9.38 टक्क्यांनी खाली आला आहे.
हे शेअर्स सर्वाधिक कोसळले
- झोमॅटो : -26%
- ट्रेंट : -24%
- जिओ फायनेंशियल : -22%
- मॅक्रोटेक डेव्हलपर्स : -20.42%
- इन्फो एड्ज (इंडिया) : -20%





