Share Market : अमेरिकेच्या शुल्क धोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष; शेअर बाजार निर्देशांकांत घट

मुंबई : भारत -अमेरिका व्यापार करार बोलणी अंतिम टप्प्यात आली असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक देशाविरोधात रेसिप्रोकल आयात शुल्काची घोषणा केली आहे. यासाठीची अंतिम मुदत नऊ जुलै आहे. त्यामुळे देश -विदेशातील गुंतवणूकदार सावध आहेत. अशा परिस्थितीत बरीच विक्री होऊन बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287 अंकांनी कमी होऊन 83,409 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 88 अंकांनी म्हणजे 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 25,433 अंकावर बंद झाला. बजाज फिन्सर्व, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरच्या भावात घट झाली.
टाटा स्टील, एशियन पेंट, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. जिओजीत इन्वेस्टमेंट लिमिटेड या कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या शुल्क धोरणाबरोबरच लवकरच भारतात जाहीर होणार्या पहिल्या तिमाईच्या ताळेबंदाकडे लक्ष आहे. त्यामुळे लघु पडल्ल्यात निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता आहे. 9 जुलै नंतर शेअर बाजारांना दिशा मिळू शकेल.
भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स तब्बल 97.6 अंकावर गेला आहे. भारताची परकीय गंगाजळी परिस्थिती ठीक असताना चालू खात्यावर शिल्लक आहे. जून महिन्यात जीएसटी संकलन 6.2% वाढून 1.84 लाख कोटी रुपये झाले आहे. मात्र परदेशातील परिस्थिती अस्थिर आहे. यामुळे गुंतवणूकदार सावध असल्याचे दिसून येते. बदललेल्या परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 1,970 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती.
बुधवारी या गुंतवणूकदारांनी 890 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. त्यातच सध्या डॉलर इंडेक्स 96.95 या चार महिन्याच्या निच्चांकावर गेला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजार आकर्षक वाटत आहे. खनिज तेलाच्या किमती कमी असल्यामुळ देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदार गेल्या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत.





