Online fraud : शेअर बाजारात भरघोस परताव्याचे आमिष; 58 वर्षीय व्यक्तीला 1.10 कोटींचा गंडा
Online fraud : शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून नवी मुंबईतील 58 वर्षीय व्यक्तीची 1.10 कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली.

Online fraud : शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगांनी नवी मुंबईतील 58 वर्षीय व्यक्तीची तब्बल 1 कोटी 10 लाख 7 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेक व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बेलापूर येथील रहिवाशाला काही व्यक्तींनी आपण आर्थिक सल्लागार असल्याचे सांगितले. शेअर बाजारातील एका गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्याला एका व्हॉट्सॲप समूहात सहभागी करून घेण्यात आले.
त्यानंतर त्याला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. तसेच एका लिंकद्वारे गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. या आमिषाला बळी पडून संबंधित व्यक्तीने गेल्या तीन महिन्यांत विविध बँक खात्यांमध्ये एकूण 1,10,07,000 रुपये जमा केले.
मात्र, गुंतवणुकीची रक्कम परत मिळत नसल्याने त्याला फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





