मुंबई – इस्त्रायल – हमास संघर्ष संपुष्टात आले आहे. भारत अमेरिकेदरम्यान व्यापार कराराबाबत चर्चा चालू आहे. अशातच अमेरिका व्याजदरात आक्रमक कपात करण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. परिणामी भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही कालपासून वाढ झाली आहे. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 862 अंकांनी वाढून 83,467 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 261 अंकांनी म्हणजे एक टक्क्याने वाढून 25,585 अंकावर बंद झाला. आज झालेल्या खरेदीचा फायदा कोटक महिंद्रा बँक, टायटन, अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक इत्यादी कंपन्यांना झाला. मात्र इटर्नल आणि इन्फोसिसचे शेअर पिछाडीवर राहिले. आगामी काळात बँकांची उलाढाल वाढण्याची शक्यता असल्यामुळे बँकां व बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या शेअरची जास्त प्रमाणात खरेदी झाली. अशा अवस्थेत शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर अंदाज वाढवून 6.6% केला आहे. त्यामुळे देशांतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांनी व संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी वाढविली आहे. शेअर बाजारावर नोंदलेल्या 2,377 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर 1,810 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. जागतिक बाजारातही कालपासून खरेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण कोरियातील शेअर बाजार निर्देशांक 2.49 टक्क्यांनी, जपानमधील शेअर बाजाराचे निर्देशांक 1.27 टक्क्यांनी, शांघाय येथील शेअर बाजाराचे निर्देशांक 0.10 टक्क्यांनी वाढले. हाँग काँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. डॉलर कमकुवत होत आहे. त्याचबरोबर भारत -अमेरिकेतील व्यापार तणाव कमी होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी या गुंतवणूकदारानी 68 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.