मुंबई – सरलेल्या 2025 या वर्षात स्मॉल कॅप आणि मिडकॅप मधील कंपन्यांनी मुख्य निर्देशांकांच्या तुलनेत कमी परतावा दिला. 2022 व 23 मध्ये स्मॉल कॅप व मिडकॅप मधील कंपन्यांच्या शेअरच्या भावात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झाल्याची भावना निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये या कंपन्यांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. रुपयाच्या मूल्यात झालेली मोठी घट, भारत -अमेरिका व्यापार युद्ध, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री या बाबीचा स्मॉल कॅप आणि मिडकॅपला 2025 मध्ये सर्वात जास्त फटका बसला. दुसर्या तिमाहीत विकासदर जास्त प्रमाणात वाढूनही या कंपन्यांना आधार मिळाला नाही. अशा परिस्थितीत लघु आणि मध्यम पडल्यातही स्मॉल कॅप आणि मिडकॅप मेडिकॅपकडे गुंतवणूकदार सावध राहून पाहण्याची शक्यता आहे. जर विकासदर खरोखरच जास्त वाढत राहिला आणि या कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले तर निवडक कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदार खरेदी करू शकतात. 24 डिसेंबरपर्यंत मिडकॅपने केवळ 0.77% म्हणजे 360 अंकांनी, तर स्मॉल कॅप 3,686 अंकांनी म्हणजे 6.68% वाढला आहे. त्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशक सेन्सेक्स 7,269 अंकांनी म्हणजे 9.30 टक्क्यांनी वाढला आहे. याचा अर्थ मुख्य निर्देशांकाबरोबरच स्मॉल कॅप आणि मिडकॅप साठी सरलेले वर्ष फारसे नफादायक ठरलेले नाही. 2024 मध्ये मात्र स्मॉल कॅपने 29 टक्के तर मिडकॅपने 26 टक्के परतावा दिला होता. त्या तुलनेत या कंपन्यांचे ताळेबंद फारसे नफादायक जाहीर न झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. जागतिक अनिश्चित परिस्थितीच्या काळात गुंतवणूकदार शक्यतो चांगले ताळेबंद असलेल्या ब्लूचिप कंपन्यावर जास्त विसंबून राहतात. त्यामुळेच 2025 मध्ये स्मॉल कॅप व मिडकॅपमध्ये नफेखोरी झाली आणि त्यातील काही गुंतवणूक मुख्य निर्देशांकातील ब्लूचिप कंपन्याकडे झाली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. मुख्य निर्देशांकातही फारशी वाढ झालेली नाही. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी सोने-चांदी आणि इतरत्र गुंतवणूक केली आहे.