मुंबई – नकारात्मक जागतिक परिस्थिती आणि परदेशी गुंतवणूकदाराकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक सलग तिसर्या दिवशी कमी झाले. मात्र काही गुंतवणूकदारांनी छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी वाढविली. त्यामुळे छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिडकॅप आणि स्मॉल कॅप बर्याच प्रमाणात वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 203 अंकांनी कमी होऊन 75,735 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 19 अंकांनी म्हणजे 0.09 टक्क्यांनी कमी होऊन 22,913 अंकावर बंद झाला. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप निर्देशांक 1.32 टक्क्यांनी तर मिडकॅप 1.18 टक्क्यांनी वाढले. छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याचे बोलले जात असूनही काही गुंतवणूकदारांनी निवडक छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. कंपन्यातील चढ-उतार ब्ल्यू चीप कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, मारुती, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, महिंद्रा, टाटा स्टील, इंडसइंड बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात खरेदी केली होती. मात्र बुधवारी पुन्हा या गुंतवणूकदारानी 1,881 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रुपया घसरत असल्यामुळे या कंपन्यांना भारतातील गुंतवणुकीवर पुरेसा फायदा होत नाही. त्यामुळे हे गुंतवणूकदार परत जात आहेत. जोपर्यंत रुपया वधावरून त्याचे मूल्य स्थिर होत नाही, तोपर्यंत हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करणार नाही तसेच सांगितले जाते. अमेरिकेतील व्याजदर कपात लांबणीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या पतधोरण समितीचे इतिवृत्त आज जाहीर झाले. यामध्ये महागाई नियंत्रणात येण्याची शक्यता कमी आहे असे सुचित करण्यात आले आहे. यामुळे आगामी काळामध्ये फेडरल रिझर्व व्याजदरात कमी प्रमाणात कपात करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजाराबरोबरच आशियाई शेअर बाजारामध्ये विक्रीचे वातावरण होते. तर युरोप व अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते.