Share Market Fraud – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी २२ लाख ७५ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ३ एप्रिल २०२४ ते १५ मे २०२६ या कालावधीत किवळे येथील एन बी एम ट्रेडर्समध्ये घडली. याप्रकरणी आरोपी नितीन भास्कर माने (रा. मंगलविश्व सोसायटी, किवळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पसार आहे. रावेत येथील एका पुरुष फिर्यादीने या संदर्भात शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले होते, त्यापैकी केवळ ९ लाख रुपये परत केले. फिर्यादीचे ५ लाख ९१ हजार रुपये आणि इतर ११ गुंतवणूकदारांचे १ कोटी १६ लाख ८४ हजार रुपये असे एकूण १ कोटी २२ लाख ७५ हजार ९०० रुपये घेऊन आरोपी मोबाइल बंद करून पळून गेला आहे. आरोपीने गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस उपनिरीक्षक वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.