Stock Market : शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 353 अंकांनी घसरला, रिलायन्स-आयटी शेअर्सवर दबाव
Stock Market : रिलायन्स, आयटी शेअर्स आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींच्या दबावामुळे सेन्सेक्स ३५३ अंकांनी घसरला. निफ्टीही ५० अंकांनी खाली आला.

Stock Market : रिलायन्स इंडस्ट्रीज, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली विक्री, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी घेतलेली सावध भूमिका यामुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी घसरण झाली. सेन्सेक्स ३५२.६४ अंकांनी घसरून ७३,२४६.०३ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५०.९० अंकांनी घसरून २२,६९८.८५ अंकांवर स्थिरावला.
दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये मोठी अस्थिरता दिसून आली. एका टप्प्यावर तो तब्बल ९९५.१ अंकांनी घसरून ७२,६०३.५७ अंकांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर बाजाराने काही प्रमाणात सुधारणा केली.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पाठबळावर असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअरने बुधवारी दमदार पदार्पण केले. १,११९ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर जवळपास २७ टक्क्यांनी वाढून बंद झाला. सुमारे १३ लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह जिओ प्लॅटफॉर्म्स देशातील रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी ठरली.
सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ३.४६ टक्के, इन्फोसिस ३.३४ टक्के, टेक महिंद्रा १.८३ टक्के, टीसीएस १.६८ टक्के, भारती एअरटेल १.४२ टक्के आणि टाटा स्टील १.३७ टक्क्यांनी घसरले.
दुसरीकडे, एल अँड टीचा शेअर जवळपास ४ टक्क्यांनी वाढला. सप्टेंबर २०२६ तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ३२.५ टक्क्यांनी वाढून ५,२०२.१० कोटी रुपये झाल्याने शेअरमध्ये तेजी आली. ट्रेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक आणि इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्सही वाढले.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. ब्रेंट क्रूडचा दर ०.९९ टक्क्यांनी वाढून ११४.५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. याचा परिणाम भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनेवर झाला.
दरम्यान, मंगळवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ४,२४०.३९ कोटी रुपयांची खरेदी केली होती.
आशियातील दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, शांघायचा एसएसई आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे निर्देशांक वाढीसह बंद झाले. युरोपातील बाजार मात्र घसरणीसह व्यवहार करत होते. अमेरिकेतील बाजार मंगळवारी वाढीसह बंद झाले.





