Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प (बजेट 2026) सादर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक असणे ही नवी बाब नाही. मात्र, गेल्या १५ वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास एक सकारात्मक चित्र समोर येत आहे. बजेटपूर्वी बाजार जरी घसरला असला, तरी बजेटनंतर शेअर बाजाराने नेहमीच जोरदार ‘कमबॅक’ केल्याचे दिसून आले आहे. बजेटपूर्वीची घसरण : गुंतवणुकीची संधी? एसबीआय (SBI) सिक्युरिटीजच्या विश्लेषणानुसार, गेल्या १५ बजेट चक्रांचा अभ्यास केला असता, बजेटच्या एक महिना आधी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनेकदा ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. फेब्रुवारी २०१४, २०१६ आणि २०२१ ही याची प्रमुख उदाहरणे आहेत. मात्र, ही घसरण तात्पुरती ठरली असून, बजेटनंतर बाजार सावरल्याचे दिसून आले आहे. जाणकारांच्या मते, बजेटपूर्वीची ही घसरण गुंतवणूकदारांसाठी खरेदीची चांगली संधी ठरू शकते. कसा राहिलाय गेल्या १५ वर्षांचा कल? रिपोर्टमधील आकडेवारी गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवणारी आहे. गेल्या १५ पैकी ११ वेळा सेन्सेक्स बजेटनंतरच्या एका आठवड्यात वाढीसह बंद झाला आहे. या काळात सरासरी २ टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. निफ्टीने गेल्या १५ पैकी १२ वेळा बजेटनंतरच्या तीन महिन्यांत सकारात्मक परतावा दिला आहे. या कालावधीत निफ्टीने सरासरी ७ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. कोणत्या सेक्टरमध्ये लागते ‘लॉटरी’? बजेटनंतर सर्वच क्षेत्रांत सारखी तेजी नसते. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, फार्मा आणि फायनान्शिअल सेक्टर या दोन क्षेत्रांनी बजेटनंतर नेहमीच सरस कामगिरी केली आहे. विशेषतः फार्मा सेक्टर १५ पैकी १४ वेळा बजेटनंतरच्या आठवड्यात वधारला आहे. ऑटो आणि रिअल्टी या क्षेत्रांची कामगिरी मात्र फार्माच्या तुलनेत काहीशी संथ किंवा कमकुवत राहिली आहे. महत्त्वाचा बदल: बजेटच्या दिवशी ‘इंडिया VIX’ (India VIX) मध्ये घट होते. याचाच अर्थ बाजारातील अस्थिरता कमी होऊन गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो. दरम्यान, इतिहास सांगतो की, बजेटपूर्वीच्या घसरणीला न घाबरता गुंतवणूकदारांनी संयम ठेवल्यास, बजेटनंतरची रिकव्हरी फायदेशीर ठरू शकते. यंदाही बाजार याच ऐतिहासिक ट्रेंडचे पालन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (सूचना: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा नक्की करा.)