Share Market: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना, भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या तीन सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला असून, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल निशाण्यावर बंद झाले. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि नफावसुलीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसून आली. बाजारातील आजची स्थिती – शुक्रवारच्या व्यवहाराअंती, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स २९६.५९ अंकांनी (०.३६%) घसरून ८२,२६९.७८ वर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९८.२५ अंकांनी (०.३९%) घसरून २५,३२०.६५ वर बंद झाला. विशेष म्हणजे, व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ६०० अंकांची गटांगळी खाल्ली होती, मात्र शेवटच्या सत्रात झालेल्या काही खरेदीमुळे ही घसरण काहीशी सावरली. साप्ताहिक कामगिरी सकारात्मक – आज बाजारात पडझड झाली असली, तरी संपूर्ण आठवड्याचा विचार करता गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरला. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सुमारे १ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. क्षेत्रीय निर्देशांकांची चाल (Sectoral Update) बाजारात आज संमिश्र वातावरण होते. मेटल क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला: सर्वात मोठी घसरण: मेटल इंडेक्स ५ टक्क्यांनी कोसळला. घसरण झालेले क्षेत्र: ऑईल अँड गॅस, बँकिंग, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये ०.५ ते १ टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्स शेअर्सची आजची स्थिती तेजीतील क्षेत्र: फार्मा, मीडिया, कन्झ्युमर ड्युरेबल आणि एफएमसीजी (FMCG) क्षेत्रात मात्र ०.७ ते १.८ टक्क्यांची वाढ दिसून आली. टॉप गेनर्स (तेजीतील शेअर्स): सेन्सेक्समधील ३० पैकी १३ शेअर्स वधारले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (१.३८%) अव्वल स्थानी राहिला. त्यापाठोपाठ एसबीआय (SBI), आयटीसी (ITC), भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये वाढ झाली. टॉप लूझर्स (घसरणीतील शेअर्स): सर्वात जास्त फटका टाटा स्टीलला (४.५७%) बसला. याशिवाय आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा या शेअर्समध्ये २.१० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. दरम्यान, बीएसईवर (BSE) आज एकूण ४,३६७ शेअर्समध्ये व्यवहार झाले. बाजारात पडझड असूनही वैयक्तिक शेअर्समध्ये तेजीचे वातावरण होते. वधारलेले शेअर्स: २,४२४ घसरलेले शेअर्स: १,७८१ स्थिर शेअर्स: १६२ ५२ आठवड्यांचा उच्चांक: ७८ शेअर्सनी नवीन शिखर गाठले. दरम्यान येत्या रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होतात, याकडे आता संपूर्ण दलाल स्ट्रीटचे लक्ष लागले आहे. हेही वाचा – Gold Silver Rates : मोठी घसरण! चांदी एका झटक्यात 60,000 रुपयांनी स्वस्त, तर सोने 10,000 रुपयांनी कोसळले