Share Market Crash: ‘या’ कारणामुळे शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले
Share Market Crash: जागतिक बाजारपेठांतील नकारात्मक वातावरण, माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील विक्रीचा दबाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या भांडवल माघारीमुळे मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

Share Market Crash: जागतिक बाजारपेठांतील नकारात्मक वातावरण, माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील विक्रीचा दबाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या भांडवल माघारीमुळे मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविण्यात आली.
मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 893.39 अंकांनी म्हणजेच 1.16 टक्क्यांनी घसरून 76,200.68 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 1,011.56 अंकांची घसरण नोंदवत 76,082.51 या दिवसातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 278.80 अंकांनी (1.16 टक्के) घसरून 23,824.10 अंकांवर स्थिरावला.
गुंतवणूकदारांना कोट्यवधींचे नुकसान – (Share Market Crash)
बाजारातील घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 4.63 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. सोमवारी 4,79,71,942.04 कोटी रुपये असलेले एकूण मार्केट कॅप मंगळवारी 4,75,08,914.09 कोटी रुपयांवर घसरले.
क्षेत्रनिहाय पाहता, आयटी आणि मेटल क्षेत्रातील समभागांवर सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी आयटी निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक, तर निफ्टी मेटल 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. पीएसयू बँक, रिअल्टी आणि खासगी बँक क्षेत्रातील समभागांमध्येही घसरण झाली. मात्र, फार्मा क्षेत्राने काहीसा आधार दिला असून निफ्टी फार्मा निर्देशांक जवळपास 1 टक्क्यांनी वधारला.

Share Market Crash: ‘या’ कारणामुळे शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले
सेन्सेक्समधील समभागांमध्ये इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले. याशिवाय भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इटर्नल यांच्या समभागांमध्येही मोठी घसरण झाली. दुसरीकडे, पॉवर ग्रिड, अॅक्सिस बँक, सन फार्मा आणि मारुती सुझुकी या समभागांनी वाढ नोंदविली. ( Share Market Crash)
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 635.91 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
जागतिक बाजाराची स्थिती – (Share Market Crash)
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाय एसएसई कॉम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. युरोपीय बाजारांमध्येही नकारात्मक कल दिसून आला.
विश्लेषकांच्या मते, आयटी क्षेत्रातील विक्रीचा दबाव, रुपयातील कमजोरी आणि अमेरिकेतील व्याजदर आणखी वाढण्याची शक्यता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव 0.67 टक्क्यांनी घसरून 77.46 डॉलर प्रति बॅरलवर आला.
बीएसईवर दिवसभरात 4,447 समभागांची खरेदी-विक्री झाली. त्यापैकी 1,496 समभाग वधारले, तर 2,794 समभाग घसरले. 195 समभागांनी वर्षभरातील उच्चांक गाठला, तर 55 समभाग वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले. 7 समभाग अप्पर सर्किटमध्ये, तर 7 समभाग लोअर सर्किटमध्ये अडकले.




