Share Market Closing 17 December, 2025: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरणीचे सत्र कायम राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोमवार आणि मंगळवारनंतर बुधवारीही बाजार लाल निशाणीवर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १२०.२१ अंकांच्या (०.१४%) घसरणीसह ८४,५५९.६५ अंकांवर स्थिरावला, तर एनएसई निफ्टीमध्ये ४१.५५ अंकांची (०.१६%) घसरण होऊन तो २५,८१८.५५ अंकांवर बंद झाला. यापूर्वी मंगळवारी बाजाराला मोठा फटका बसला होता. काल सेन्सेक्स ५३३.५० अंकांनी तर निफ्टी १६७.२० अंकांनी कोसळला होता. बुधवारी देखील ही घसरण थांबली नाही. सेन्सेक्समधील ३० पैकी १५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर निफ्टीमधील ५० पैकी २६ कंपन्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. आजच्या व्यवहारात ‘भारतीय स्टेट बँक’ (SBI) १.५१ टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी ठरली. त्यापाठोपाठ इन्फोसिस, सन फार्मा, ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी आणि टीसीएस यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि टाटा मोटर्स या कंपन्यांचे शेअर्सही हिरव्या निशाण्यावर बंद झाले. दुसरीकडे, ‘ट्रेंट’च्या शेअर्समध्ये सर्वाधिक १.६४ टक्क्यांची घसरण झाली. एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली. याशिवाय बीईएल, टायटन, एशियन पेंट्स आणि कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही आज तोटा सहन करावा लागला. आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर्सदेखील घसरणीसह बंद झाले. बाजारातील या सलग घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले असून, आगामी काळात बाजार सावरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजार घसरणीची कारणे – दरम्यान, अमेरिकेतील रोजगारविषयक मिश्र आकडेवारी, परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि रुपयातील कमकुवतपणा यामुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात नफा बुकिंगचा दबाव निर्माण झाला. आशियाई बाजारांकडून मिळालेल्या हिरव्या संकेतांदरम्यान, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० नेही सुरुवात केली परंतु नंतर दबावाखाली आले. आज सलग तिसऱ्या व्यापार दिवशी ते रेड झोनमध्ये बंद झाले. व्यापक पातळीवर, आज मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता.