Share Market : शेअर बाजारात वादळापूर्वीची शांतता; अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

मुंबई : नऊ जुलै अगोदर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध देशाविरोधात एकतर्फे किती आयात शुल्क लावायचे याची घोषणा करणार आहेत. त्याचबरोबर भारतासोबत अमेरिकेचा करार अजून मार्गी लागलेला नाही. या घटना क्रमाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी स्थिर राहिले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 9 अंकांनी वाढून 83,442 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी शुक्रवारच्या 25,461 अंकावर स्थिर राहिला.
आशियाई शेअर बाजारातून सकाळी नकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री चालू असल्यामुळे निर्देशांकात वाढ झाली नाही. एकीकडे ग्राहक वस्तू आणि खनिज तेल कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर माहिती तंत्रज्ञान आणि धातू क्षेत्राची पीछेहाट झाली. भारताविरोधात अमेरिकेने मूळ 10% शुल्क आहे. या शुल्का बरोबरच 26 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. मात्र 26 टक्के शुल्काच्या अंमलबजावणीसाठी 9 जुलै ही अंतिम तारीख ठेवण्यात आली होती.
अशा परिस्थितीत या संदर्भातील बोलणी पुढे गेलेले नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नऊ जुलै रोजी काय निर्णय घेतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. याचा परिणाम भारताबरोबरच इतर देशातील शेअर बाजारावर झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठे व्यवहार करणे टाळले आशिका इन्स्टिट्यूशनल इक्विटी या कंपनीचे विश्लेषक सुंदर केवाट यांनी सांगितले.
कोणत्या कंपन्या आघाडीवर
आज झालेल्या व्यवहारांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, इटर्नल या कंपनीच्या शेअरच्या भावात घट झाली. रॅलीगेअर ब्रोकिंग या कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, अमेरिकेच्या धोरणामुळे केवळ शेअर बाजारावरच नाही तर चलन बाजार व इतर बाजारावरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत देश विदेशातील गुंतवणूकदार सावध आहेत.
जागतिक बाजारात संमिश्र वातावरण
अमेरिकेच्या शुल्क धोरणाच्या पार्श्वभूमीवर जपान, हाँगकाँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. तर दक्षिण कोरिया आणि शांघाय येथील शेअर बाजाराचे निर्देशांक अल्प प्रमाणात वाढले. अशीच परिस्थिती युरोपियन शेअर बाजारातही होती. शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच वाढले होते. खनिज तेलाच्या किमती दरम्यानच्या काळामध्ये काही प्रमाणात वाढत आहेत. तर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 760 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जर अमेरिकेने भारताबाबत नकारात्मक निर्णय घेतला तर परदेशी संस्थागत गुंतवणुकीवर बराच परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





