Share Market: शेअर विक्रीचा वेग मंदावला, मात्र सलग तिसर्या दिवशी शेअर निर्देशांकात घट

मुंबई – जागतिक आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाच इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारात विक्रीचे वातावरण आहे. समाधानी बाब म्हणजे काल आणि परवा निर्देशांक जवळजवळ एक टक्क्याने कोसळले होते. आज मात्र निर्देशांक अर्धा टक्क्याने कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 456 अंकांनी म्हणजे 0.60 टक्क्यांनी कमी होऊन 72,943 अंकावर बंद झाला. निफ्टी 124 अंकांनी म्हणजे 0.56 टक्क्यांनी कमी होऊन 22,147 अंकावर बंद झाला. जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होईल या भावनेतून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची जास्त प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फोसिस, इंडसइंड बँक, बजाज फिन्सर्व, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा या कंपन्याच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली. तर टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, मारुती, आयटीसी, पावर ग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही.
जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, सुदैवाने तिसर्या दिवशी निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले नाहीत. दरम्यानच्या काळात अमेरिकेतील किरकोळ विक्री जास्त वाढल्यामुळे अमेरिकेत व्याजदर कपात लांबणीवर पडणार आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलर बळकट होत आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. अमेरिकन डॉलर अधिकच बळकट झाल्यामुळे त्याचा भारतासारख्या देशाच्या चलनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान युद्धामुळे आणि अमेरिकेचा डॉलर बळकट होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या आठवड्यात भारतातील विक्री वाढविली असून काल या गुंतवणूकदारांनी तब्बल 3,268 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जोपर्यंत जागतिक परिस्थिती निवळत नाही आणि अमेरिकन डॉलर कमकुवत होत नाही तोपर्यंत हे गुंतवणूकदार भारतात विक्री करत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.




