नफेखोरी बळावल्यामुळे शेअर निर्देशांकांत घट

नफा घसरल्याने टाटा मोटर्सचा शेअर कोसळला 7 टक्‍क्‍यांनी

मुंबई – एक्‍झिट पोल जाहीर झाल्यानंतर सोमवारी शेअरबाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात उसळले होते. मात्र निर्देशांक गरजेपेक्षा जास्त पातळीवर आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष निकाल वेगळे लागू शकतात असे वाटल्यामुळे मंगळवारी शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात नफेखोरी होऊन निर्देशांक कमी झाले.

मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 382 अंकांनी म्हणजे 0.97 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 38,969 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 119 अंकांनी म्हणजे 1.01 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 11,709 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.4 टक्‍क्‍यांपर्यंत घसरले.

मंगळवारी झालेल्या विक्रीचा सर्वात जास्त फटका वाहन दूरसंचार, धातू, तंत्रज्ञान आणि बॅंकिंग क्षेत्राला बसला. टाटा मोटर्स या कंपनीचा शेअर आज तब्बल सात टक्‍क्‍यांनी कोसळला. या कंपनीच्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात 49 टक्‍क्‍यांची घट झाल्यामुळे हा परिणाम झाला. सोमवारी सेन्सेक्‍स तब्बल 1422 अंकांनी तर नीफ्टी 421 अंकांनी वाढला होता. दहा वर्षात प्रथमच एकाच दिवसात निर्देशांक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले होते. आता सर्व गुंतवणूकदार प्रत्यक्ष निकालाकडे लक्ष देऊन आहेत.

गुरुवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल मिळाल्यानंतरच शेअरबाजारांना खऱ्या अर्थाने दिशा मिळू शकणार आहे. काल मोठ्या प्रमाणात मूल्यवर्धन झाल्यानंतर मंगळवारी रुपयाचे मूल्य दोन पैशांनी कमी होऊन 69.72 रुपये प्रति डॉलर झाले. त्याचबरोबर क्रुड 0.04 टक्‍क्‍यांनी वाढूून 72.02 डॉलर प्रति पिंप पातळीवर गेले.

“मुळातच निर्देशांक कंपन्यांच्या ताळेबंदाच्या पार्श्वभूमीवर उच्च पातळीवर असताना स्थिर सरकारच्या अपेक्षेने सोमवारी निर्देशांक उच्च पातळीवर गेले होते. त्यामुळे सावध गुंतवणूकदारांनी मंगळवारी नफा काढून घेणे पसंत केले. जर एक्‍झिट पोलप्रमाणे स्थिर सरकार आले तर आगामी काळात निर्देशांक एक तर स्थिर राहतील किंवा काही प्रमाणात वाढतील.
-विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.