अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा सरकारला मोलाचा अनुभवी सल्ला, स्वीकारल्यास सर्वांचा होणार फायदा

मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या संकटात पीडितांना भेटण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची गर्दी वाढल्याने सरकारी यंत्रणांचे लक्ष नुकसानीचे पंचनामे आणि आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळत आहे. यामुळे पंचनाम्यांना विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवावेत, असा अनुभवसिद्ध सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना फटका –
शरद पवार यांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करताना सांगितले की, अतिवृष्टीमुळे केवळ शेतकऱ्यांच्याच पिकांचे नुकसान झाले नसून, जनावरे दगावली आहेत आणि गावातील लहान-मोठे व्यावसायिक, कारागीर, शेतमजूर आणि बारा बलुतेदार तसेच मागासवर्गीय समुदायावरही या संकटाची मोठी झळ बसली आहे. गावपातळीवर इंधन आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला असून, सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान करण्याची गरज आहे. तसेच, रोगराई पसरण्याचा धोका लक्षात घेता आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करणे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेल्या परिणामांकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
लातूर भूकंपावेळी पंतप्रधानांनाही थांबवले –
शरद पवार यांनी लातूर भूकंपाच्या काळातील अनुभव सांगताना नमूद केले की, त्यावेळी आपत्ती निवारण आणि पंचनाम्यांच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून आपण लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले होते. इतकेच नव्हे, तर इतर नेते आणि थेट पंतप्रधानांनाही भूकंपग्रस्त भागात तात्पुरते दौरे न करण्याची विनंती केली होती. “लातूर भूकंप आणि मुंबई बॉम्बस्फोटासारख्या अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना मी जवळून केला आहे. अशा वेळी शासकीय यंत्रणेचे योगदान मोलाचे ठरते. महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी अशा संकटात स्वत:ला झोकून देऊन काम करतात, फक्त त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे,” असे पवार म्हणाले.
अतिरिक्त मनुष्यबळाची गरज –
नुकसानीच्या पंचनाम्यांचा व्याप आणि मदतकार्याची गती लक्षात घेता, आपत्तीग्रस्त भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त मनुष्यबळ आणि महसूल, कृषी, पाटबंधारे यासारख्या शासकीय यंत्रणा तातडीने पाठवण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सुचवले. राज्य सरकार पीडितांना दिलासा देईल आणि त्यांना पुन्हा सक्षम करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांनी आपल्या अनुभवातून दिलेला हा सल्ला सध्याच्या संकटकाळात सरकारसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. प्रशासकीय यंत्रणांना प्राधान्य देऊन पीडितांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी नेत्यांनी संयम राखावा, असा सूर त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला.





