मुंबई – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यभरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदी दरम्यान नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत ३१ मार्चपर्यंत घरामधून बाहेर पडू नये असे निर्देश सरकारतर्फे देण्यात आलेत. दरम्यान, जेष्ठ नेते शरद पवार हे देखील सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत आहेत. शरद पवारांनी आपल्या ट्विटर खात्याद्वारे याबाबत माहिती दिली असून घरामध्ये व्यतीत करत असलेला वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा ते सध्या हा वेळ वाचन करून सत्कारणी लावत आहेत. याबाबत त्यांनी आपला पुस्तक वाचन करत असलेला एक फोटो देखील ट्विट केला आहे. हा अनुभव इतरांसोबत शेअर करताना ते लिहतात, “पुस्तक हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करताना घरातच बसण्याची वेळ आल्यावर लोक विचारतात तुम्ही काय करता आहात? मी सांगतो… घरी पुस्तक वाचत आहे. #StayHomeStaySafe घरातच थांबा, सुरक्षित राहा!” दरम्यान, कोरोना या विषाणूची लागण बाधितांच्या संपर्कात आल्याने होत असल्याचे वैद्यकीयरित्या स्पष्ट झाले असून यामुळं नागरिकांनी काही दिवस इतरांशी संपर्क टाळल्यास कोरोना विषाणूची साथ पसरण्यास अटकाव केला जाऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचे निर्देश दिले असून याचे पालन केल्यास आपण नक्कीच कोरोना विषाणूच्या प्रसार थांबवू शकतो.