Sharad Pawar On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला, तसंच जातीचे राजकारण पसरवण्यात हातभार लावू नये, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. यावर आता खुद्द शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला माहीत नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही, तसा माझा इतिहास नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला कळलेले नाही. कारण मी त्या रस्त्याने कधीच जात नाही. मला माझा महाराष्ट्र थोडासा ओळखतो. माझी अशी पार्श्वभूमी नाही. मी कधीही आग्रह केलेला नाही करणार नाही. त्यांनी कारण नसताना माझे नाव घेतले आहे. मी पण आज महाराष्ट्रात फिरत आहे. माझ्या पण गाड्या अडवल्या आहेत. राज ठाकरेंनी माझं नाव विनाकारण घेतलं. मराठवाड्यात त्यांच्या गाडीवर हल्ला झाला, मीही मराठवाड्यात फिरलो, तिथे मलाही लोकांनी अडवलं,” असे सडेतोड उत्तर शरद पवार यांनी दिले.
शरद पवारांचा राज ठाकरेंना प्रतिसवाल
शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. यावर “मणिपूरचा प्रश्न वेगळा आहे. हातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो. मी बोललो हे हातभाराचे लक्षण आहे की सौजन्याचे लक्षण आहे? राज ठाकरे यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी महाराष्ट्रात नेहमीच सकारात्मक बदलांसाठी प्रयत्नशील असतो आणि महाराष्ट्रातील जनतेला माझी भूमिका चांगलीच कळते,” असे प्रत्युत्तर पवारांनी दिले.
महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, यासाठी पावलं टाकली पाहिजेत. यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांना योग्य वाटतील त्या व्यक्तींना निमंत्रित करावं, आणि आम्हीही उपस्थित राहू, आमची समन्वय, सहकार्याची भूमिका राहील. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र ही मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. धनगर, लिंगायत, मुस्लीम आरक्षण याविषयीही भूमिका जरांगेंनी मांडली आहे, असं पवार म्हणाले.