“भारत हा नेहमीच….”; भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर शरद पवारांची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर दोन्ही देशांनी शनिवारी (१० मे) जमीन, हवा आणि समुद्रातील सर्व सैन्य कारवाया थांबवण्याचा निर्णय घेत शस्त्रसंधी लागू केली. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी स्वागत केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली असून, १२ मे रोजी दुपारी १२ वाजता DGMO स्तरावर पुढील चर्चा होईल.
शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे. भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं. जय हिंद!”
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनीही शस्त्रसंधीची पुष्टी केली. अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की, दोन्ही देश तटस्थ ठिकाणी व्यापक चर्चेसाठी तयार आहेत. अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ यांच्या शहाणपणाचे कौतुक केले.





