पुणे – “एमपीएससी उमेदवारांच्या मागण्यांबाबत आपण त्यांच्या पाठिशी आहोत. या उमेदवारांच्या शिष्टमंडळासह दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. तुम्ही उपोषण मागे घ्या,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी. पण, या उमेदवारांनी “आंदोलक कोअर टीमशी चर्चा करून निर्णय घेऊ,’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत हे उपोषण सुरूच होते. बालगंधर्व रंगमंदिर चौकात हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनास बसले आहेत. यास अनेक नेत्यांनी भेटी देत पाठिंबा दिला. यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शरद पवार यांनी या उमेदवारांची भेट घेत आंदोलनस्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पवार म्हणाले, “एका विद्यापीठाचे कुलगुरू मला भेटायला आले होते. एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केल्याची माहिती त्यांनी मला दिली. या बदलांविरोधात कृषी विद्यापीठातील हे परीक्षार्थी 26 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात एक बैठक घेण्याचं आश्वासन दिले. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाने आपल्यासोबत यावे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे तुमची बाजू मांडणे आवश्यक आहे,’ असेही शरद पवार उमेदवारांना म्हणाले. शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलन करणाऱ्या उमेदवारांपैकी पाच जणांचे शिष्टमंडळ हे शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याबाबत तयार झाले आहेत. खुर्ची नाकारत उभे राहून संवाद… शरद पवारांच्या आगमनानंतर आंदोलकांमध्ये उत्साह संचारला आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी उमेदवारांनी जागा करून दिली आणि शरद पवार हे विद्यार्थी आंदोलनच्या मधोमध पोहोचले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना खुर्ची देऊ केली पण पवारांनी ती नाकारली आणि उभे राहून संवाद साधला.