तेलंगणाची जनता शरद पवारांचे उपकार विसणार नाही; के. चंद्रशेखर राव यांचे गौरवोद्गार

मुंबई, – तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेच तेलंगणा राज्याची निर्मीती झाली. तेलंगणाची जनता संपूर्ण आयुष्यभर शरद पवार यांचे उपकार विसरणार नाही, अशा भावना के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले. यावेळी अभिनेते प्रकाश राज, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.
चंद्रशेखर राव म्हणाले, शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत. देशातील सध्याच्या राजकारणावर आमच्यात चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच बारामतीत आम्ही एक बैठक घेऊ. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन देशात परिवर्तनासाठी प्रयत्न करू. ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे, त्या पद्धने सध्या विकास होत नाही. त्यामुळे देशात परीवर्तन झालेच पाहिजे.
शरद पवार यांनी आज मला आर्शीवाद दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात काम करायचे आहे. समविचारी पक्षांसोबत चर्चा करून आमची भूमिका लवकरच देशासमोर ठेवू अशी माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली.





