धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार शरद पवारांची तोफ; कोणावर साधणार निशाणा?

बीड : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये देखील फुट पडली. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीससोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतील फूटीनंतर आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले जाणार आहे. मात्र राष्ट्रवादीत झालेल्या दोन गटानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. त्यानंतर त्यांना कृषिमंत्री पद देखील मिळाले. त्यामुळे आता शरद पवार आज धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटाबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार हे आज सकाळी औरंगाबादहून बीडच्या दिशेने निघणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता ते बीडमध्ये पोहोचतील. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांची बीडच्या महालक्ष्मी चौकातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 ते 4 पर्यंत शरद पवार हे सभास्थळी असणार असून यादरम्यान ते जाहीर सभेतून विरोधकांवर तोफ डागणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता ते बीडहून छत्रपती संभाजी नगरकडे निघणार आहेत. शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेला जवळपास 45 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शरद पवारांची ही सभा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्यासाठी असल्याच्या चर्चा देखील सध्या सुरु झाल्या आहेत. यावर धनंजय मुंडे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. शरद पवारांच्या बीडमधील सभेबाबत विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले, “एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.” बीडमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री मुंडे यांनी हे विधान केले होते.
धनंजय मुंडे समर्थकांकडून बॅनरबाजी
तर दुसरीकडे, धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बॅनरवर पवारांचा फोटो लावत ‘साहेब, बीडमध्ये आपले हार्दिक स्वागत. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या. आपला माणूस हक्काचा माणूस,’ असे या बॅनरवर म्हटले आहे. मात्र यापूर्वीच शरद पवारांनी अजित पवार गटाला ‘माझे फोटो वापरल्यास कोर्टात जाणार,’ असा इशारा दिला होता.





