शिरूर – शिरूर-हवेली मतदारसंघात 2009 ते 2014 या कालावधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण विकासकामे केली असल्याने शिरूर हवेलीच्या सर्व सामान्य मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ठरविणार असल्याचे सुतोवाच माजी आमदार व उमेदवार अशोक पवार यांनी यावेळी बोलताना केले.
शिरूर-हवेली मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शिरूर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा झाली, त्यावेळी माजी आमदार पवार बोलत होते.
याप्रसंगी पक्षाचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी, पक्ष प्रवक्ते विकास लवांडे, जितेंद्र बढेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिलाध्यक्ष वैशाली नागवडे , कॉंग्रेसचे कौस्तुभ गुजर, महेश ढमढेरे, किरण आंबेकर, शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वैशाली वाखारे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, सुजाता पवार, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, पोपटराव दसगुडे, दिनकर पाडळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, संचालक दिलीप मोकाशी, बाबासाहेब फराटे, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, उपसभापती बाळासाहेब नागवडे, शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, वकील सेलचे ऍड. शिरीष लोळगे, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, उपाध्यक्ष ऍड. रवींद्र खांडरे, कार्याध्यक्ष रवींद्र ढोबळे, युवकचे कुंडलिक शितोळे, रंजन झांबरे, महिलाध्यक्ष पल्लवी शहा, यासह शिरूर-हवेली मतदारसंघातील कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला उपस्थित होते.
अमोल मिटकरी म्हणाले की, देशात सर्वांत मोठी 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्याचे व बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करुन महिलांना सर्व क्षेत्रात आरक्षण देण्याचे मोठे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. भाजप सरकारच्या काळात शेतमालाला भाव नाही, तसेच देशात मोठी आर्थिक मंदी येऊन उद्योग धंदे बंद पडले असून हे सरकार सर्व सामान्यांचे नसून अदानी, अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपतींचे असल्याची टीका त्यांनी केली.
ज्यांनी पक्ष विरोधी काम केले अशा लोकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातुन तात्काळ हाकलून देण्यात येणार असून शिरूर हवेली मतदार संघाच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांना निवडून द्या.
-जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस